लवकरच स्वदेशी व्हॉट्सॲप 'संवाद' नागरिकांच्या सेवेत

19 Feb 2024 12:14:09
 
soon whatsapp to be replaced by sanwad app
 
 
एबी न्यूज नेटवर्क:
जगातील सर्वाधिक लोकप्रिय अशा व्हॉट्सॲप या संदेशवहन मंचाला टक्कर देण्यासाठी आता 'संवाद' हा अस्सल स्वदेशी मंच तयार आहे.
 
 
केंद्र सरकारच्या 'सेंटर फॉर डेव्हलपमेन्ट ऑफ टेलिमॅटिक्स'ने (सी-डॉट) विकसित केलेल्या या ॲपने नुकतीच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची (डीआरडीओ) महत्त्वपूर्ण चाचणी उत्तीर्ण केली आहे. त्यामुळे लवकरच ते नागरिकांच्या मोबाईलवर दिसू लागेल, अशी शक्यता आहे.
 
व्हॉट्सॲप प्रमाणेच या मंचावरून पाठविले जाणारे संदेश हे एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड असतील. ते पाठवणारा आणि ग्रहण करणारा यांखेरीज अन्य कोणालाही वाचता येणार नाहीत. याशिवाय त्यात वन-ऑन-वन एसएमएस, ग्रुप मेसेजिंग, कॉलिंग, स्टेटस ठेवणे, फोटो-व्हिडीओ किंवा डॉक्युमेंट्स शेअर करणे, लोकेशन, कॉण्टॅक्ट आणि इतर माहिती पाठवणे अशा विविध सुविधा देण्यात आलेल्या आहेत.
 
गोपनीयतेविषयीची अनेक फीचर्सही यात दिलेली असून, त्या दृष्टीने 'रिमोट डेटा वाइप' हा एक महत्त्वपूर्ण पर्याय यात असेल. सी-डॉटच्या संकेतस्थळावर याविषयीची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. हे ॲप अँड्रॉईड तसेच आयओएस या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिममध्ये चालू शकणार आहे.
Powered By Sangraha 9.0