जैन मुनी संत आचार्य विद्यासागर महाराज झाले ब्रह्मलीन; ७७ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

    18-Feb-2024
Total Views |

Acharya Shri 108 Vidhyasagar Ji Maharaj
 (Image Source : tw/@narendramodi)
 
रायपूर :
जगप्रसिद्ध जैन मुनी संत आचार्य विद्यासागर महाराज (Jain muni Acharya Vidyasagar Maharaj passes away) हे ब्रह्मलीन झाले आहेत. शनिवारी मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास त्यांनी समाधी (देहत्याग) घेतली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. अखेर त्यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी छत्तीसगडमधील डोंगरगड येथील चंद्रगिरी तीर्थ येथे जगाचा निरोप घेतला. आचार्य विद्यासागर महाराज यांच्या पार्थिवावर आज, १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली आहे.
 
 
गेल्या काही दिवसांपासून आचार्य विद्यासागर महाराज यांची प्रकृती अस्वस्थ होती. गेल्या तीन दिवसांपासून त्यांनी अन्नपाणी सोडले होते. आचार्य शेवटच्या श्वासापर्यंत शुद्धीत राहिले आणि त्यांनी मंत्रोच्चार करत शरीर सोडले आणि ब्रह्मलीन झाले. शनिवारी मध्यरात्री २.३० वाजता त्यांनी समाधी घेत देहत्याग केला. समाधीवेळी पूज्य मुनिश्री योगसागर महाराज, समतासागर महाराज, प्रसादसागर महाराज यांच्यासह संघ उपस्थित होता. त्यांच्या स्मरणार्थ आज देशभरातील जैन समाज आणि आचार्यश्रींच्या भक्तांनी आपली प्रतिष्ठाने एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 

पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी आचार्य विद्यासागर महाराज यांना आदरांजली वाहिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'आचार्य श्री 108 विद्यासागर महाराज यांचे निधन ही देशाची कधीही भरून न येणारी हानी आहे. लोकांमध्ये आध्यात्मिक प्रबोधनासाठी त्यांनी केलेले बहुमोल प्रयत्न सदैव स्मरणात राहतील. आयुष्यभर ते दारिद्र्य निर्मूलन तसेच समाजात आरोग्य आणि शिक्षणाचा प्रसार करण्यात व्यस्त राहिले. त्यांचे आशीर्वाद मला मिळत राहिले हे माझे भाग्य आहे. छत्तीसगडमधील चंद्रगिरी जैन मंदिरात गेल्या वर्षी त्यांच्याशी झालेली माझी भेट माझ्यासाठी अविस्मरणीय असेल. तेव्हा मला आचार्यजींचे खूप प्रेम आणि आशीर्वाद मिळाले. समाजासाठी त्यांचे अतुलनीय योगदान देशातील प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील.'