निष्कलंक चारित्र्याचे, अजातशत्रू व्यक्तिमत्व - आर आर पाटील

16 Feb 2024 12:16:09

former dcm raosaheb rajaram patil death anniversary
 (image source: internet)
 
 
राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले निष्कलंक चारित्र्याचे माजी उपमख्यमंत्री रावसाहेब राजाराम पाटील उर्फ आर. आर. पाटील यांचा आज स्मृतिदिन. आजच्याच दिवशी म्हणजे १६ फेब्रुवारी २०१५ रोजी आर. आर. पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. आर. आर. पाटील यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. आर. आर. पाटील म्हणजे राजकारणातील आम आदमी. शेतकरी असोत की सर्वसामान्य नागरिक, गरीब असोत की वंचित प्रत्येकाला आर. आर. पाटील आपले वाटत होते. राजकारणात उपमुख्यमंत्री पदासारख्या मोठ्या पदापर्यंत पोहचूनही कायम जमिनीवर राहून जनतेशी नाळ टिकवलेले आर. आर. पाटील सर्वसामान्यांचे नेते होते. म्हणूनच त्यांना सर्वसामान्य नागरिक त्यांना प्रेमाने आबा म्हणत.
 
१६ ऑगस्ट १९५७ रोजी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील अंजनी गावात एका गरीब शेतकरी कुटुंबात आबांचा जन्म झाला. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने आबांनी कमवा आणि शिका या योजनेतून शिक्षण घेतले. बी. ए. झाल्यानंतर त्यांनी एलएलएलबी चे ही शिक्षण घेतले. कॉलेज जीवनातच त्यांनी शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न शासन दरबारी मांडायला सुरुवात केली. त्यांच्यातील नेतृत्व गुण वसंत दादा पाटलांनी हेरले आणि त्यांना राजकारणात आणले. कोणतीही राजकीय पार्शवभूमी नसताना समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द, मनाला भिडणारी भाषण शैली आणि स्वच्छ प्रतिमेच्या जोरावर त्यांनी अल्पावधीतच राजकारणात बस्तान बसवले. १९७९ साली पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून आबा निवडून आले. १९७९ ते १९९० असे एकवीस वर्ष आबा जिल्हा परिषद सदस्य होते.
 
१९९० साली आबांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली आणि प्रचंड मतांनी जिंकली. त्यानंतर २०१४ पर्यंतच्या विधानसभेच्या सर्व निवडणुका आबांनी जिंकल्या. १९९५ साली आबा दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर राज्यात युतीचे सरकार आले. विरोधी पक्षात असलेल्या आबांनी राजकीय आयुधांचा वापर करून अनेकदा सत्तधाऱ्यांना कोंडीत पकडले. विरोधी पक्षात असूनही आबांनी विधानसभा गाजवून सोडली. १९९९ साली राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर ते राष्ट्रवादीत आले. शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू साथीदार अशी त्यांची ओळख बनली. त्यांनीही राष्ट्रवादी घराघरात पोहचवण्यासाठी जीवाचे रान केले. ते काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष होते. राज्य मंत्रिमंडळात त्यांना अनेक महत्वाची पदे मिळाली. आर. आर. पाटील ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पुढे राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली. गृहमंत्री असताना त्यांनी राज्यातील डान्स बार बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. डान्स बार बंद करण्याचा त्यांच्या निर्णयाला कडाडून विरोध झाला पण ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
 
गृहमंत्री असतानाच त्यांनी महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान राबवले. गृहमंत्री असताना त्यांनी खाजगी सावकारी विरूध्दही दंड थोपटले होते तसेच त्यांनी गुटखा बंदी करण्याचा देखील निर्णय घेतला होता. त्यांच्या याच धडाकेबाज निर्णयांनी त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले होते. गृहमंत्री, उपमुख्यमंत्री अशी मोठी पदे भूषवूनही आबांनी तळागळातील कार्यकर्त्यांशी असलेला संवाद तुटू दिला नाही. सत्ता येते आणि जाते जोडलेले माणसे टिकवली पाहिजेत हे आबांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. उच्च पदावर पोहचूनही आबांनी आपला साधेपणा कायम ठेवला. इतक्या मोठ्या पदावर असतानाही आबांनी आपल्या पाल्यांना महागड्या इंग्रजी शाळेत न घालता जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत घातले होते. आबांसारखे तळागळातून आलेले स्वच्छ चारित्र्याचे निष्कलंक, अजातशत्रू व्यक्तिमत्व राजकारणात विरळच. सध्याच्या गढूळ राजकीय वातावरणात तर आबांसारख्या निष्कलंक चारित्र्याच्या नेत्याची आवर्जून आठवून येते. राजकारणात त्यांनी जो आदर्श घालून दिला आहे त्याचे अनुकरण आजच्या राजकीय नेत्यांनी केले तरच राजकीय नेत्यांवरील जनतेचा उडालेला विश्वास पुन्हा प्राप्त होईल. आबांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
 
 
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 
 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत. 
 
 
Powered By Sangraha 9.0