नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या धम्मदीप नगर येथील श्री गणेश लॉजमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव कुणाल नारखेडे (रा. जळगाव) असे असून तो दोन दिवसांपूर्वीच या लॉजमध्ये राहण्यासाठी आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, लॉजच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित खोलीतून प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा उघडला असता, मृतदेह दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह कुजण्यास सुरुवात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.