शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी आज महायुतीची बैठक; महत्वाचा निर्णय येण्याची शक्यता

03 Dec 2024 13:25:07

Mahayuti meeting today at Shindes Varsha residence(Image Source : Internet/ Representative) 
 
 
 
मुंबई :
महाराष्ट्रातील निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला लागला. यात महायुतीला दणदणीत विजय मिळाल्यानंतर आज ११ दिवस उलटूनही मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. एकनाथ शिंदेंनी वरून जो आदेश येईल तो आम्हाला मान्य असेल असे म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी जोर धरत आहे. भाजपचे अनेक बडे नेते तसा दावा देखील करत आहेत. दरम्यान आज राज्याचे कार्यवाहक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर आज दुपारी मोठी बैठक होणार आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे वृत्त समोर आले आहे.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा बंगल्यावर होणाऱ्या आजच्या बैठकीला भाजप नेते आणि माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत मंत्रालयांबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.
 
विजय रुपाणी आज मुंबईत दाखल होणार
भाजपचे निरीक्षक आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आज संध्याकाळपर्यंत मुंबईला पोहोचणार असून त्यापूर्वी त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, मला वाटते की भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपमधून एखाद्याला मुख्यमंत्री केल्यास आम्हाला काही अडचण नाही, असे विधान केले होते. मला वाटते यावेळी भाजपचा कोणीतरी मुख्यमंत्री होईल.
 
 
 
पुढे विजय रुपाणी म्हणाले, मी आज संध्याकाळी मुंबईला जाणार आहे. निर्मला सीतारामन देखील मुंबईत येत आहेत. उद्या सकाळी ११ वाजता महाराष्ट्र भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. तिथे आमची चर्चा होईल आणि त्यानंतर एकमताने विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाईल. हायकमांडला नाव कळवले जाईल. त्यानंतर घोषणा केली जाईल.
 
 
 
आमच्या हायकमांडने तिन्ही मित्रपक्षांशी चर्चा केली. त्यामुळे, कोणतीही अडचण नाही. सर्व काही सुरळीतपणे आणि एकमताने केले जाईल, असे रुपाणी यांनी सांगितले.
 
नितीन गडकरी यांचे मोठे वक्तव्य
दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या नुकत्याच झालेल्या वक्तव्यानेही राजकारणातील अटकळांना उधाण आले आहे. नागपुरातील एका कार्यक्रमात ते म्हणाले की, जो नगरसेवक झाला, त्याला दुःख आहे की आमदार झालो नाही, जो आमदार झाला, त्याला मंत्री होता आले नसल्याचे दुःख आहे, तर जो मंत्री झाला त्याला मनासारखे खाते मिळाले नसल्याचे दुःख आहे आणि मुख्यमंत्री होता न आल्याचे शल्य त्यांच्या मनात आहे. जो मुख्यमंत्री झाला आहे, त्याला पक्षश्रेष्ठी केव्हा पदावरून बाजूला करतील याची भीती सतावत आहे. राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा सागर आहे. इथे कुणीही समाधानी नाही.
 
 
 
५ डिसेंबर रोजी होणार शपथविधी सोहळा
नव्या महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख जाहीर झाली असून ५ डिसेंबर रोजी हा सोहळा पार पडणार आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली होते. तसेच या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एनडीएचे सर्व बडे नेते सहभागी होणार आहेत, असे त्यांनी सांगितले होते.
 
त्यानंतर आता ५ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुती नेते मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. यावेळी बोलताना भाजप नेते गिरीश महाजन म्हणले, ५ डिसेंबरला येथे चांगला कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय घेण्यासाठी उद्या बुधवारी भाजपच्या विधानसभा सदस्यांची बैठक होणार आहे.
 
 
 
याशिवाय शिवसेना नेते संजय शिरसाट म्हणाले की, शपथविधी सोहळा मोठ्या थाटात पार पडणार आहे. आम्हाला आज संध्याकाळी कळेल एकनाथ शिंदे सरकारचा भाग असतील की नाही. आज संध्याकाळी आमची (शिवसेना) बैठक होणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0