नागपूर :
नागपूरचा 18 वर्षीय युवक दक्ष खंते याने ऑस्ट्रेलियामधील पश्चिम भागात बसल्टन येथे होणाऱ्या आयरनमॅन शर्यतीत भाग घेतला. ही प्रतिष्ठित स्पर्धा 1 डिसेंबर रोजी पार पडली. यात जगभरातील 52 देशांतील 3,500 हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. या शर्यतीत खेळाडूंना पोहणे, सायकलिंग आणि धावणे अशा तीन टप्प्यांमधून आपल्या कौशल्याची चाचणी द्यावी लागली. दक्षच्या या कामगिरीने नागपूरकरांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.
1 डिसेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेच्या दिवशीच दक्षचा वाढदिवस होता, त्याने 18 व्या वर्षात पदार्पण केले. पूर्ण-अंतर श्रेणीतील सर्वात तरुण खेळाडू म्हणून तो या शर्यतीत सहभागी झाला. जगभरातील 52 देशांतील 3,500 खेळाडूंच्या सहभागातून होणाऱ्या या स्पर्धेत दक्षची कामगिरी नागपूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट ठरत आहे.
आयआयआयटी जबलपूरचा विद्यार्थी असलेल्या दक्षला या स्पर्धेसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले आहे. माईल्स अँड माईलर्सचे संचालक डॉ. अमित समर्थ, एंड्यू स्पोर्ट्सचे यश शर्मा आणि शशिकांत चांदे यांनी त्याला योग्य प्रशिक्षण आणि प्रोत्साहन दिले आहे.
या खडतर स्पर्धेसाठी त्याची आई, जी योग प्रशिक्षक असून त्यांनी दक्षच्या शारीरिक आणि मानसिक तयारीत मोठा हातभार लावला आहे. दक्षचे वडील सीएसी ऑलराऊंडरचे संचालक अमोल खंते यांनी आत्मविश्वास व्यक्त केला होता की, त्यांचा मुलगा ही शर्यत यशस्वीपणे पूर्ण करेल.