- जयंती नागरी 7 चा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न
(Image Source : x/@cbawankule)
नागपूर :
खेळ मांडला, नटरंग अश्या एक ना अनेक प्रसिद्ध गाण्यांचे सादरीकरण करत भारतीय संगीतकार आणि गायक अजय-अतुल या जोडीने संपूर्ण नागपूरकरांना मंत्रमुग्ध केले. नागपूरातील जयंती नगरी 7 या टाऊनशिपच्या उद्घाटनाप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या 'अजय-अतुल' यांच्या लाईव्ह इन कॉन्सर्टने संपूर्ण बेसा परिसर दुमदुमून उठला.
अभिजीत रियल्टर्स ॲण्ड इन्फ्राव्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड (ARIPL) च्या बेसा येथील बहुप्रतिक्षित जयंती नगरी 7 या आलिशान टाऊनशिपचा भव्य उद्घाटन सोहळा शनिवार 30 नोव्हेंबर रोजी थाटात पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर, कांचनताई गडकरी माजी खासदार अजय संचेती, जयंती मजुमदार, जॉयदेब मजुमदार, अभिजीत मजुमदार, इनु मजुमदार यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाची सुरुवात 'स्पेशल ऑलम्पिक भारत' मध्ये अनेक पदके पटकावलेल्या स्पेशल मुलांच्या गाण्यांनी झाली. यावेळी त्यांनी एकाहून एक सुंदर गाणी गात श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. विकलांग आणि ऑटिजम या विकाराने ग्रसित असले तरी त्यांच्या गायनाच्या कौशल्याने त्यांनी सर्व उपस्थतांचे मन जिंकले. यावेळी अभिजीत मजुमदार आणि इनु मजुमदार यांनी त्यांना दोन लाख देणगी देण्याची जाहीर असून गडकरींच्या हस्ते त्यांना ही देणगी देण्यात आली. यानंतर जयंती नगरी 7 मधील घरमालकांना त्यांच्या फ्लॅटची चाबी देण्यासाठी 'की हंडींग ओव्हर सेरेमनी' करण्यात आली. यानंतर अजय-अतुल यांनी 'नटरंग उभा' या त्यांच्या धमाकेदार गाण्यासह एंट्री करताच श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटासह त्यांचे स्वागत केले. यावेळी अजय-अतुलसह त्यांची जवळपास ५० ते ६० जणांची टीम स्टेजवर त्यांना कोरस आणि वादनाची साथ देत होती.
यावेळी अजय-अतुल आणि त्यांच्या टीमने आई भवानी, उदो ग अंबे उदो, नटरंग उभा, खेळ मांडला, अभी मुझ में कही, अधीर मन झाले, चंद्रा, याड लागलं, जीव रंगला, लल्लाटी भंडार, वाट दिसू दे, अप्सरा आली, झिंगाट, देवा श्री गणेशा, माउली माउली अश्या अनेक गाण्याचे सादरीकरण केले. विशेष म्हणजे त्यांच्या श्रोत्यांकडून त्यांच्या झिंगाट गाण्याला वन्स मोअर मिळाले असून या गाण्याच्या तालावर तेथे सर्व उपस्थित थिरकले. त्यांच्या एकाहून एक सादरीकरणाने जणू संपूर्ण बेसा परिसर दुमदुमून उठला होता.
कॉन्सर्ट दरम्यान, अजय-अतुल यांनी गाण्याची कथा सांगण्यात किंवा अधेमधे वेळ न घालवता केवळ गाणे सादर करणार असल्याचे सांगितले. केवळ १० पर्यंतचीच वेळ असल्याने आम्ही पटापट गाणी घेतो, नाहीतरी ठरवलेली पण पूर्ण होणार नाहीत असे अतुल गोगावले म्हणाले. कार्यक्रमासाठी कोणती गाणी निवडावी आणि कोणती सोडावी, असा मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा राहतो. तुमच्यापैकी अनेकांना वाटेलही की अरे हे गाणे राहिले, हे त्यांनी म्हणायला हवे होते. पूर्ण गाणी गाण्यासाठी आम्हाला निदान ७ ते ८ तास लागतील, असेही ते म्हणाले.
गडकरींनी केली 'देवक काळजी रे' गाण्याची फर्माईश
अजय-अतुल एकापाठोपाठ एक गाणी गात असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना 'देवक काळजी रे' हे गाणे गाण्याची फर्माईश केली. यावेळी हे गाणे त्यांच्या आजच्या सॉंग लिस्टमध्ये नसल्याचे सांगितले. मात्र, गडकरींनी गाण्याची विशेष मागणी केल्यानंतर ते म्हणायलाच लागेल असे म्हणत अजय गोगावले यांनी 'देवक काळजी रे' गाण्याच्या ४ ओळी गायल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेडिओ ऑरेंजचे नॅशनल क्रिएटिव्ह हेड मिलिंद पाटील यांनी केले. यावेळी ARIPL, रेडिओ ऑरेंज आणि अभिजीत भारतचे अधिकारी आणि कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.