- 'अनंतकोटी ब्रह्मांडनायक योगिराज गजानन महाराज की जय' चा गजर
- 'जागर भक्तीचा' मध्ये हजारो गजानन भक्तांची उपस्थिती
नागपूर :
विदर्भाचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे दैवत असलेल्या श्री गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाच्या 21व्या अध्यायाचे सामूहिक पठण गुरुवारी अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडले.
सकाळी हनुमान नगरच्या ईश्वर देशमुख शरारीक शिक्षण महाविद्यालयाच्या परिसरात खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत ‘जागर भक्तीचा’ उपक्रमात श्री गजानन विजय ग्रंथाच्या 21व्या अध्यायाचे पठण भक्तिभावाने आणि हजारो गजानन भक्तांच्या मंदियाळीच्या साक्षीने संपन्न झाले.
दीपप्रज्वलन आणि गजानन महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला विधीवत सुरूवात करण्यात आली. यावेळी संस्कार भारतीच्या प्रमुख कांचन गडकरी, प्रवदा प्रवीण दटके, धरमपेठ शाळेचे कोषाध्यक्ष आणि लघु उद्योग भारतीचे पदाधिकारी कुणाल एकबोटे, गजानन महाराज सहकारी बँकेचे स्वप्नील मोंढे, डॉ. दीपक खिरवडकर, हरिपाठ मंडळाचे चंद्रशेखर क्षेत्रपाल या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
संतकवी दासगणू महाराजांनी रचलेल्या श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करण्यापूर्वी गजानन महाराजांच्या नामाचा गजर करण्यात आला. गजानन महाराज मानसपूजा आणि गण गण गणात बोते याचा संगीतमय जागर उपस्थित भक्तांनी केला. त्यानंतर एका सुरात सामूहिक पठणाला प्रारंभ झाला. त्यामुळे परिसरात आध्यात्मिक अनुभूति संचारली. त्यानंतर संत गजानन मानसपूजा आणि श्रींची मंगल आरती या प्रमाणे कार्यक्रमाचा समारोप झाला.
स्वप्ना सगूळले, दिपाली अवचट, अनिल मानापुरे, अतुल सागुलले, अभिजीत कठाळे, विश्वनाथ कुंभलकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. जागर भक्तीचाचे संयोजक डॉ. श्रीरंग वराडपांडे, विजय फडणवीस, अविनाश घुशे, श्रद्धा पाठक देखील प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.