'अभिजात मराठीचा' फुलला मोगरा

19 Dec 2024 16:58:18

- खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा सहावा दिवस प्रतिभा आणि प्रतिमांनी अलंकृत
- प्रसिद्ध कलाकारांनी सादर केले अभंग, पोवाडा, गोंधळ, नाट्यगीते

abhijat marathi program on 6th day of khasdar sanskrutik mahotsav
 
 
नागपूर :
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून साकारलेल्‍या व कलागुणांचा संगम असलेल्‍या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या (Khasdar Sanskrutik Mahotsav) सहाव्या दिवशी विचारांची आशयघनता असलेल्या अभिजात मराठीचा मोगरा फुलला.
 
निमित्त होते अभिजात मराठी - संगीत, नृत्य आणि साहित्य यांचा त्रिवेणी संगम असलेला भव्य सांगीतिक कार्यक्रमाचे. हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात हा महोत्सव सुरू आहे. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संस्कार भारतीच्या प्रमुख कांचन गडकरी, ना. पंकज भोयर, आ. सुधीर गाडगीळ, आ. अमर महाडिक, डॉ. विकास महात्मे, तरुण भारतचे संचालक धनंजय बापट, नवराष्ट्रचे संपादक संदीप भारंबे, माजी खा. अजेय संचेती आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
 
भाषेची प्राचीनता, अखंडता, मौलिकता या आधारे भाषेला अभिजात दर्जा दिला जातो. मराठी अभिजात होतीच फक्त आता तिच्यावर शासनाची मोहर उमटली आहे. त्या मराठी भाषेला आपल्या प्रतिभा आणि प्रतिमेने अधिकच अलोकिक सौंदर्य प्रदान करणारे संत ज्ञानेश्‍वर, चार्वाक, संत एकनाथ, तुकारामांपासून ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे, वि. वा. शिरवाडकरांपर्यंत सर्वांना मानाचा मुजरा करणा-या या कार्यक्रमात अजित परब, मुग्‍धा वैशंपायन, सावनी रविंद्र, संकर्षण क-हाडे, आनंद इंगळे, भार्गवी चिरमुले, नंदेश उमप यांनी सहभाग घेतला होता. ओम नमोजी आद्या, मोगरा फुलला, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, खेळ मांडियेला वाळवंटी बाई, एकनाथांचे ओघवते भारुड, छत्रपती शिवरायांची महती सांगणारा तडफडदार पोवाडा, हळुवार अभंग, देवीच्या उपकार स्तवनाचा विधी - गोंधळ, श्रुतीप्रिय नाट्यगीते, गीत रामायण, जयोस्तुते, प्रसिद्ध चित्रपट गीते, शृंगारिक लावणी या कलाकारांनी प्रभावीपणे सादर केली. मराठी भाषेचा गोडवा सांगणारी 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' या कविवर्य सुरेश भट यांच्या कवितेने या दर्जेदार, रसाळ कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमाचे निवेदन गिरीजा ओक गोडबोले, संकर्षण कऱ्हाडे यांनी तर संहिता लेखन ऋषिकेश जोशी यांनी केले होते.
 

Abhijat Marathi program 
 
उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब कुळकर्णी व रेणुका देशकर
यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, अशोक मानकर, दिलीप जाधव, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, डॉ. दीपक खिरवडकर, आशिष वांदिले, सीए संजय गुळकरी यांनी केले.
 
संघ गितांद्वारे राष्ट्र आराधना
कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात शाम देशपांडे व चमुतर्फे संघ गितांद्वारे राष्ट्र आराधना करण्यात आली. ज्या भूमीत राम, कृष्णालाही जन्म घ्यावासा वाटला, त्या आपल्या देशाप्रती निस्सीम भक्ती व्यक्त करणारी गीतमाला याप्रसंगी सादर झाली. मातृभूमी के प्रतीक हम, चंदन है इस देश की माटी, सूरसंगम - तालसंगम, वंदेमातरम्, देश में चरित्र की महानता रहे, हम भारत की नारी है, जननी जन्मभूमी या देशभक्तीपर गीतांनी रसिक मन ओथंबून गेले. कार्यक्रमाचे निवेदन श्वेता गर्गे यांनी केले. विजय बोरीकर, प्रा. प्रशांत पांडवकर, जयंत आणि प्रशांत उपगडे, छाया वानखेडे, वैशाली उपाध्ये, माधवी पळसोकर, सीमा सराफ, अश्विनी लुले, प्रतीक्षा पट्टलवार, निधी रानडे, आकांक्षा चारभाई, मनीषा कुळकर्णी, सौरभ किल्लेदार, अभिजित बोरीकर, श्रीधर कोरडे, गजानन रानडे, योगेश हिवराळे यांचा गायन, वादनात सहभाग होता. खासदार सांस्कृतिक समिती तर्फे ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0