राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाई स्कॉच मद्यासह 37 लाख मुद्देमाल जप्त

    09-Nov-2024
Total Views |

State Excise Department seizes 37 lakh worth of goods
 
 
एबी न्यूज नेटवर्क :
विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईत नागपूर येथून तब्बल 37 लाख 71 हजार 200 रुपयांचा विदेशी स्कॉच मद्याचा साठा जप्त करण्यात आला.
 
गुप्त माहिती मिळाल्यानंतर उत्पादन शुल्‍क विभागाने तत्काळ ही कारवाई केली. नागपूर पोलीस स्टेशन सिताबर्डीच्या हद्दीत धरमपेठ मुलीच्या शाळेजवळ निलय अशोक गडेकर याच्या राहत्या घरासमोर असलेल्या वाहनामधून हा साठा जप्त करण्यात आला.
 
महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेल्या व हरियाणा राज्यासाठी विक्रीकरीता उपलब्ध असलेल्या मद्याचा हा साठा सदर वाहनामधून उतरविला जात होता. हा माल याच जागेवर उभे असलेल्या वाहन क्रमांक एम एच 46 बी.के. 6492 टोयाटो फॉरर्चून या गाडीची झडती घेतली असता आढळून आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, राज्य उत्पादन शुल्क संचालक (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, राज्य उत्पादन शुल्क विभागीय उप आयुक्त अनिल चासकर, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सुरजकुमार रामोड यांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
 
 
 
जप्त करण्यात आलेल्या विदेशी मद्य साठयात उच्च प्रतिच्या रेडलेबल, ब्लॅकलेबल, जेबसन, बॅलेंटाईन या सुमारे 71 सिलबंद बॉटल्स जमा करण्यात आल्या. सदर वाहनासहीत व जप्त केलेल्या मोबाईल सहीत मुद्देमालाची एकूण किंमत सुमार 37 लाख 71 हजार 200 रुपये एवढी आहे. सदर गुन्ह्यात वाहनाचा चालक व मालक निलय अशोक गडेकर यास अटक करुन अमित किशोर बोबडे या इमास फरार घोषित करण्यात आले आहे. सदर इसमाविरुध्द मुंबई दारुबंदी कायदा 1949 च्या कलम 65-अ,इ, 81,83,90 व 98 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 
गुन्हा उघडकीस आणण्यांमध्ये निरीक्षक मंगेश कावळे, शैलेश अजमिरे, दुय्यम निरीक्षक शितल बेदरकर तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक विनोंदसिंग ठाकुर, व जवान राहुल पवार, धवल तिजारे, अंकुश भोकरे व महिला जवान सोनम शिंगणे यानी विशेष परिश्रम घेतले.
 
या गुन्हयाचा तपास उमेश शिरनाते, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अ 2 नागपूर हे करीत असून फिर्यादी जवान प्रशांत धावले आहेत. कारवाईमध्ये उप अधीक्षक अतुल कोठलवार, निरीक्षक मोहन पाटील, आनंद पचार, जितेन्द्र पवार, बालाजी चाळणीवार, दुय्यम निरीक्षक श्यामली कुरडकर, सुनयना वाघमारे, अमित क्षीरसागर व जवान सुरज सहारे तसेच वाहन चालक अरशिल मिर्झा व विनोद डुमरे यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.