भाजपकडून 15 लाख ऐवजी 1500 रुपयांवर केली बोळवण

    08-Nov-2024
Total Views |
- उध्दव ठाकरेंची तोफ महायुतीवर धडाडली
-यशोमती ठाकूर यांच्या प्रचारार्थ वलगाव येथे विराट सभा

Uddhav Thackeray 
अमरावती:
नुसत्या निवडणूक आल्या की योजनांचा महापुर आणायचा, मात्र रोजगाराचा पत्ता नाही. जनतेला प्रत्येकी 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन देणा:या भाजपने जनतेची 1500 रुपयांवर बोळवण केली. विरोधकांना महाराष्ट्र लुटायचा होता म्हणून त्यांनी आमच्याशी गद्दारी केली आणि सरकार पाडले. माझी बहीण यशोमती ठाकूर ह्या वाघीण आहेत,त्या संकट काळात पाठीशी उभ्या होत्या. सत्तेतील तिघे म्हणजे भाऊ-भाऊ, सगळे मिळून महाराष्ट्र खाऊ, अशी यांची ही भाऊबंदकी आहे. आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बहिणींवर प्रेम दाखविणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी महिलावर झालेल्या अत्याचाराबद्दल ही बोलावे. ही निवडणूक महाराष्ट्र प्रेमी आणि महाराष्ट्र द्रोही यांच्यात होत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. आता मात्र दाढीवाला, देवा भाऊ आणि जॅकेटवाल्यांनी राज्य कर्जबाजारी केले असा गंभीर आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
 
वलगाव येथील यशोमती ठाकूर यांच्या प्रचार्थ आयोजित येथील जाहीर सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. महाविकास आघाडीच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांच्या प्रचारार्थ वलगाव येथे विराट सभा घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल, खा. अरविंद सावंत, आ. मिलिंद नार्वेकर, काँग्रेस पक्षाचे नेते कुणाल चौधरी, उदय पानसे, महाविकास आघाडीच्या उमेदवार यशोमती ठाकूर, खा.बळवंत वानखडे, रिपाई नेते डॉ. राजेंद्र गवई यांच्यासह अन्य मान्यवरांनी उपस्थिती होती.
 
यावेळी पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की यशोमती ठाकूर ह्या माझ्या मंत्रिमंडळात कर्तबगार मंत्री होत्या, त्यांनी महाराष्ट्र राज्यात चांगले काम केले असून तिवसा मतदारसंघाचा चांगला विकास केला आहे. शेतकरी महिला आणि दुर्बल घटकासाठी यशोमतीने केलेले कार्य प्रशंसनीय आहे. यशोमती सारख्या बुलंद व कर्तबगार नेत्याची राज्याला गरज आहे त्यांना मोठ्या मताधिक्याने आपण विजयी करावं असे आवाहन करून उद्धव ठाकरे यांनी अमरावती जिल्ह्यातील सर्वच मतदार संघात महाविकास आघाडीला नागरिकांची साथ असल्याचे नमूद केले. लोकसभेसारखाच विश्वास विधानसभेतही दाखवावा जेणेकरून येणाऱ्या काळात भ्रष्टाचारी व गद्दारांना त्यांची जागा दाखवून देऊ आणि महाराष्ट्र पुन्हा सुजलाम सुफलाम करू असे त्यांनी प्रतिपादन केले.
 
-लोकतंत्र व संविधान वाचवा-बघेल
-ये जनता है सब जानती है
शेतकऱ्यांच्या आत्महत्या,महिला वरील अत्याचार, तोडफोडीच राजकारण, वाढती गुन्हेगारी याला कंटाळून महाराष्ट्रातील जनता पुन्हा महाविकास आघाडीला बहुमताने निवडून देतील. सत्तेतील कमिशनखोर आणि चोरांना घरी बसवा. कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही आधार न घेता संविधानाची तोडफोड करणाऱ्या आणि जातीत तेढ निर्माण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करा असे आवाहन करून यशोमती ठाकूर यांनी ‘ये जनता है सब जानती है’ असे सांगून विरोधकांवर चांगलीच तोफ डागली.