एबी न्यूज नेटवर्क :
काँग्रेसच्या नेत्यांनी नागपूर शहराचा विकास रोखून धरला होता. मिहानला विरोध करणारेही काँग्रेसचेच नेते होते. विलास मुत्तेमवार आणि नितीन राऊत यांनीच मिहानच्या विरोधात जोरदार आंदोलन केले होते. आज त्याच मिहानमध्ये मोठ्या कंपन्या आल्या आणि ८८ हजार तरुणांना रोजगार मिळाला. १ लाख कोटींपेक्षा जास्त रुपयांची कामे शहरात झाली. आज नागपूरचे चित्र बदलले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
नितीन गडकरी यांच्या हस्ते दक्षिण-पश्चिम, पश्चिम व उत्तर नागपूरच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. ‘नागपूर शहराच्या विकासाची ही प्रक्रिया थांबायला नको. कारण हा प्रश्न शहराच्या भविष्याचा आहे. ही उमेदवाराचे भविष्य ठरविणारी निवडणूक नसून जनतेच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे,’ असेही ते म्हणाले. 1947 पासून आजपर्यंत देशाच्या इतिहासात काँग्रेसला मुंबई, नागपूर दिल्लीमध्ये राज्य करण्याची संधी मिळाली. साठ वर्षांपेक्षा जास्त काळ काँग्रेसने सत्ता उपभोगली. दहा वर्षांत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आणि त्यापूर्वी चार वर्षे अटलजींच्या नेतृत्वातील भाजपच्या सरकारने मोठ्या प्रमाणात विकास केला, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
मी विधानपरिषदेचा आमदार होतो तेव्हा रिंगरोडच्या निर्मितीसाठी २३ वेळा पाठपुरावा केला. अजनी चौकात वारंवार अपघात व्हायचे. सगळी वाहतूक शहरातून व्हायची. रिंगरोडचे काम थांबले होते. एका शाळेतील शिक्षिकेने मोठे आंदोलन रिंगरोडसाठी केले होते. आपण रिंगरोड तर बांधलाच, पण मी मंत्री झाल्यावर साडेचारशे कोटी रुपये देऊन सिमेंट काँक्रिटचा रस्ता केला. आता रिंगरोडवर १३५ लोक बसू शकतील अशी फ्लॅश चार्जिंगवर धावणारी इलेक्ट्रिक बस सुरू होत आहे. या बसचे भाडे डिझेल बसच्या तुलनेत ३० टक्के कमी असेल, असेही गडकरी म्हणाले.
आज आपली नागपूर मेट्रो भारतातील सर्वांत चांगली मेट्रो आहे. गेल्या दहा वर्षांत पाण्यासाठी एकही मोर्चा निघालेला नाही. चोवीस तास पाणी देण्याचे आव्हान स्वीकारले. ते यशस्वी करून दाखवले. आता जलकुंभ आणि नवीन पाईपलाईनचे काम सुरू आहे. चोवीस तास पाण्याची योजना यशस्वी करून दाखविणारे हे पहिले शहर आहे. शहरात मजबुत असे सिमेंट काँक्रिटचे रस्ते बांधले. ऑरेंज सिटी स्ट्रिट चांगली होत आहे. याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरण केंद्र तयार होणार आहे. व्यायाम शाळा देखील उभारली जाणार आहे. दीड ते दोन हजार आसन क्षमतेचे मोठे सभागृह निर्माण केले जाईल. सुसज्ज असे भाजी बाजार-मटण मार्केट तयार होणार आहे, याचा गडकरी यांनी आवर्जून उल्लेख केला.
काँग्रेस म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा
‘काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत खोटा प्रचार केला. संविधान बदलणार असल्याचे पसरवले. मात्र या देशात संविधानाचे तुकडे कुणी केले असतील, तर ते काँग्रेसने केले आहेत. आमच्यावर संविधान बदलाचा आरोप करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत,’ अशी टीका गडकरी यांनी केली.
शहराच्या विकासात फडणवीस यांचे मोठे योगदान
रिंग रोडवरील कोतवालनगर चौकात दक्षिण-पश्चिमचे महायुतीचे उमेदवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. या सभेला हिंगण्याचे आमदार समीर मेघे, माजी आमदार नाना श्यामकुळे, माजी महापौर नंदा जिचकार, संदीप जोशी, प्रकाश भोयर, मुन्ना यादव, राजू हडप, गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. देवेंद्र यांनी मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री असतानाही मोठ्या प्रमाणात निधी दिला. नागपूरची जनता विकासकामांना मत देईल असा विश्वास आहे. त्यामुळे देवेंद्र यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन गडकरी यांनी केला.
कोहळेंच्या रुपात प्रामाणिक कार्यकर्त्याला विजयी करा
कोहळेंच्या रुपाने एक प्रामाणिक कार्यकर्ता पश्चिम नागपूरला उमेदवार म्हणून लाभला आहे. त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन गडकरी यांनी केले. बोरगाव येथे पश्चिम नागपूरचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या निवडणूक कार्यालयाचे गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी माजी खासदार अजय संचेती, माजी महापौर दशांकर तिवारी, माजी महापौर माया इवनाते, भाजप नेते जयप्रकाश गुप्ता आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. मिलिंद माने यांच्या विजयाचा निर्धार करा
डॉ. मिलिंद माने यांनी यापूर्वी एकदा उत्तर नागपूरचे प्रतिनिधित्व केले आहे. आता पुन्हा एकदा त्यांच्या विजयाचा निर्धार करा, असे आवाहन गडकरी यांनी केले. वैशाली नगर येथे उत्तर नागपूरचे उमेदवार डॉ. मिलिंद माने यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी महायुतीचे उमेदवार डॉ. मिलिंद माने, भाजपचे नागपूर शहराध्यक्ष जितेंद्र कुकडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा आदींची प्रमुख उपस्थिती होती.