-सुनील खराटेंच्या प्रचारार्थ बडनेरात जाहीर सभा
अमरावती:
बटेंगे तो कटेंगे म्हणत हिंदु-मुस्लीम तेढ निर्माण करणारी भाजप पुन्हा सत्तेत बसण्याची स्वप्ने बघत आहे. हे लोकं महाराष्ट्रातील सगळे उद्योग गुजरातला नेत आहे. हे मोदी, शहांच्या विचारांवर चालणारे राज्य नसून हे स्वाभिमानी लोकांचे राज्य आहे, हे राज्य तोडणा:या आणि लुटणा:या या लोकांना सत्तेतून खाली खेचत सत्तेबाहेर करण्याचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले.
बडनेरा विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील खराटे यांच्या प्रचारार्थ बडनेरा नवी वस्ती येथील आठवडी बाजार प्रांगणात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या जाहीर सभेला उद्धव ठाकरे संबोधित करत होते.
या जाहीर महासभेच्या मंचावर शिवसेना नेते खा.अरविंद सावंत, बडनेरा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार सुनील खराटे, अमरावती विधानसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ.सुनील देशमुख, खा. बळवंत वानखडे, माजी खा. अनंत गुढे, रिपाई चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष डॉ. हेमंत देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी आ.प्रदीप वडनेरे, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी, महानगर प्रमुख पराग गुडधे, आसावरी देशमुख, भीमशक्तीचे पंकज मेश्राम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
ज्याच्या हातात मशाल तोच आपला खरा उमेदवार असून सुनील खराटे सारख्या सामान्य कार्यकर्त्याला तुमच्या आशीर्वादाची गरज असून तुम्ही मतदानरुपी आशीर्वाद देऊन बहुमताने विजयी कराल असा विश्वास देखील उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
गाडगेबाबांच्या दशसुत्रीला अनुसरून वचननामा
संत गाडगेबाबांनी दशसुत्री दिली असून एक कुटुंबप्रमुख म्हणून त्यांच्या दशसूत्रीवर आधारित वचननामा तयार केलेला आहे. गाडगेबाबांनी जे संस्कार व विचार दिले त्या संस्कार व विचारला जपण्याचे काम शिवसेनेने केले असल्याचे सांगून काही मिंध्ये हे गाडगेबाबांचे संस्कार व विचार पुसून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा हल्लाबोल देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारणार असल्याची घोषणा यांनी केली.
प्रत्यक्ष कृती करून दाखविणार- खराटे
जाहीर सभेत बडनेरा विधानसभा मतदार संघातील उमेदवार सुनील खराटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मी बोलणार नाही तर प्रत्यक्ष कृति करून दाखवणार अशी हमी देत मी खेळाडू आहे, खेळाडू नेहमीच जिद्दीने खेळतो आणि जिंकण्यासाठीच खेळतो या निवडणुकीच्या खेळात सुद्धा आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने जिंकणार असा मला विश्वास असून माझ्या मशाल चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन सुनील खराटे यांनी जाहीर सभेत केले.