बस खाली आल्याने दुचाकीस्वार पोलिस ठार

    07-Nov-2024
Total Views |
-गुरुकुंज मोझरी रोडवरील घटना

policeman killed 
अमरावती:
गडचीरोली जाणार्या भरधाव एसटी बसखाली आल्याने दुचाकीस्वार पोलिस ठार झाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास तिवसा येथील गुरुकुंज मोझरी रस्त्यावर घडली. संदीप देविदास चौधरी (40, रा. परतवाडा), असे मृतक पोलिस हवालदाराचे नाव आहे. संदिप चौधरी हे मोझरी येथे आयोजित उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेतील बंदोबस्ताचे कर्तव्य बजावण्यासाठी जात असतानाच हा अपघात घडला. या घटनेमुळे पोलिस विभागात शोककळा पसरली आहे.
 
चांदूर बाजार पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे पोलिस हवालदार संदीप चौधरी हे बुधवारी मोझरी येथील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येत असल्याने बंदोबस्ताचे कर्तव्य बजावण्यासाठी जात होते. दरम्यान काही वेळात परत येतो, असे त्यांनी सहकार्याला सांगून ते दुचाकीने निघून गेले. अशातच ते मोझरीजवळील रस्त्याने दुचाकीने जात असताना, अचानक अमरावतीवरून गडचिरोली जाणार्या एमएच 40 सीएम 5951 क्रमांकाच्या बससमोर त्यांच्या दुचाकी आली आणि दुचाकीस्वार संदीप देविदास चौधरी हे बसच्या चाकाखाली येऊन चिरडल्या गेले. त्यामुळे त्यांचा जागिच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळ गाठून संदीप चौधरी यांचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या घटनेमुळे पोलिस विभागात शोककळा पसरली आहे. दरम्यान विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांच्यासह जयंत झाडे, स्वप्निल धनाड, जीवन वानखडे, योगेश ठाकरे आदी महामंडळाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पुढील तपास तिवसा पोलिस करीत आहेत.