वरुड-मोर्शी मतदारसंघात चौरंगी लढत

    07-Nov-2024
Total Views |
-दोन्ही राष्ट्रवादी मैदानात मत विभाजनाचा दोन्ही बाजूला धसका

Warud Morshi Constituency 
वरुड:
मोर्शी विधानसभा मतदारसंघात (Warud Morshi Constituency) एकूण 19 उमेदवार रिंगणात असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) व भारतीय जनता पार्टी या तीन उमेदवारांमध्ये मुख्य सामना रंगणार आहे, तर अपक्ष उमेदवाराची या लढतीला तिसरी किनार लाभल्याने चुरस आणखीनच वाढली आहे.
 
महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाच्या वतीने विद्यमान आमदार देवेंद्र भुयार दुसऱ्यांदा रिंगणात उतरले आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गिरीश कराळे यांनी दंड थोपटले आहे. तर भाजपाचे उमेदवार चंदू उर्फ उमेश यावलकर यांनी या निवडणुकीत उडी घेत महायुतीला घरचा आहेर दिला आहे. या तीन प्रमुख उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होणार आहे. तर माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र विक्रम ठाकरे हे सुध्दा अपक्ष उमेदवार म्हणून या तिघांच्याही नाकी नऊ आणण्याकरिता तयार आहेत. त्यामुळे हा सामना तिरंगी नसून चौरंगी होणार असल्याचे दिसत आहे. गेल्या निवडणुकीत माळी समाजाचा मोठा वर्ग असलेल्या या मतदारसंघात भाजपाने उमेदवारी न दिल्यामुळे त्यांना हार पत्करावी लागली. त्यामूळे या वेळेला माळी समाजाचे उमेदवार म्हणून भाजपाने चंदु उर्फ उमेश यावलकर यांना उमेदवारी दिल्याची चर्चा मतदारसंघात आहे.
 
गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार व काँग्रेस-राष्ट्रवादी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार या दोघांमध्येच लढाई काट्याची झाली होती, तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार विजयी झाले होते. आता मात्र ती परिस्थिती राहिलेली नाही. या निवडणुकीत चारही उमेदवार कस लावून उभे आहेत. त्यामुळे निवडून येणार तरी कोण असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांना पडलेला आहे. अशा वेळी जातीपातीचे समीकरण लावून विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे सांगणे सध्या तरी कठीण असले तरी पक्षाचीच बाजू भक्कम आहे, एवढे मात्र खरे. यावेळी महाविकास आघाडीने गिरीश कराळे व महायुतीतील अजित दादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देवेंद्र भुयार तसेच अपक्ष उमेदवार विक्रम ठाकरे हे तीनही उमेदवार एकाच समाजाचे असल्यामुळे भाजपाने चंदू उर्फ उमेश यावलकर या माळी समाजाच्या नेत्याला उमेदवारी दिल्यामुळे समीकरण बदलू शकते अशी चर्चा आहे.