-त्यांचे फतवे निघतात, आमच्या मतांचे काय?
- सायंस्कोर मैदानावर राज ठाकरेंची पुन्हा गर्जना
अमरावती:
मशिदींवरच्या भोग्यांविरुध्द पुन्हा एकदा एल्गार पुकारत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मतदारांना आश्वासित केले की, मनसे ला सत्तेत आणले तर मशिदीवरील भोंगे दिसणार नाही, आम्ही ते भोंगे काढून घेवू. माझ्या मोबाईलवर एक क्लिप मला एका युवकाने पाठविली आहे, ज्यामध्ये मशिदीमधून महाविकास आघाडीतील पक्षांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यांचे असे फतवे निघत असतील तर आम्ही विखुरलेले? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
अमरावती मतदारसंघामध्ये मनसेचे अधिकृत उमेदवार मंगेश उर्फ पप्पू पाटील यांच्या प्रचारार्थ येथील सायंस्कोर मैदानवर एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज ठाकरे बोलत होते.
यावेळी मंचावर अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे, पंकज साबळे, उमेदवार मंगेश पाटील, अकोट मतदारसंघाचे उमेदवार कॅप्टन सुनील डोबाळे, अमरावती जिल्हाध्यक्ष राज पाटील, शहराध्यक्ष धीरज तायडे, प्रसिद्धी प्रमुख पवन सावरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
राज ठाकरे पुढे आपल्या भाषणात म्हणाले की, तुम्हाला चांगले वाटावे म्हणून बोलत नाही, माझे अमरावतीशी वेगळे नाते आहे. अमरावतीला आलो की, मला माझ्या घरी आल्यासारखे वाटते. अमरावतीमधील तरुण-तरुणींना पुण्याला नोक:यांच्या शोधात जावे लागते, कारण येथे नोक:या नाही, आयटी पार्क नाहीत. पक्ष बदलू आमदारांना आपण वारंवार निवडून देतो, म्हणून त्यांची वारंवार पक्ष बदलण्याची हिंमत होते. आपण जातीपाती वाटल्या गेलो असल्याने आपल्यावर कुणीही सत्ता करु शकतो. कारण हिंदू हा दंगलीत हिंदू असतो, दंगल संपली की, तो जातीत विभागल्या जातो. इम्तीयाज जलील सारखा माणूस शेकडो मुस्लिमांना घेवून मुंबईवर धडक देवू शकतो, इतकी हिंमत कशी होते त्यांची. आमच्या हाती सत्ता आल्यावर हे नाटकं बंद होतील. शरद पवारांनी या महाराष्ट्रातील हिंदुत्वाचा माहौल बर्बाद केला, महाराष्ट्र त्यांनी जातीपातील विभागला. मराठा-ब्राम्हण, मराठा-ओबीसी असे वाद पेटविण्याचे काम शरद पवारांनी केले. समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक बांधल्यापेक्षा त्यांच्या किल्ल्यांचे जतन व्हावे. मुंबई, पुण्यामध्ये जाणारा तरुण त्याच्या गावातच थांबवा असा विकास आम्हाला घडवून आणायचा असल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
राजकमल चौकात जे झाले ते पुन्हा होवू नये-पप्पु पाटील
काँग्रेसचा खासदार निवडून आल्यावर राजकमल चौकात त्यांनी पिवळी माती उधळली, पाकीस्तानचे झेंडे फडकविले, एका महिलेचा अपमान केला. हे यानंतर होता कामा नये, याकरिता आम्ही आता एक मनसेच्या रुपाने सक्षम पक्ष आणि आमदार कसा निवडून आणू याकडे जनतेने लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन यावेळी पप्पु पाटील यांनी आपल्या भाषणातून यावेळी केले.