राज्य उत्पादन विभागाची कारवाई; आचारसंहितेच्या कालावधीत 17 लक्ष 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

07 Nov 2024 22:26:51
-103 आरोपींना अटक तर 13 वाहने जप्त

State Production Department 
बुलढाणा:
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कालावधीत अवैध मद्यनिर्मिती, वाहतुक व विक्री मोठ्या प्रमाणात होतात. अशा घटनाना प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत (State Production Department) विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत आचारसंहिता कालावधीत दि. 5 नोव्हेंबरपर्यंत अवैध मद्यनिर्मिती व विक्री प्रकरणी 17 लक्ष 35 हजार 20 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. पराग मो. नवलकर यांनी दिली आहे.
 
जिल्ह्यात कार्यरत विविध अनुज्ञप्त्यांच्या व्यवहारावर देखरेख तसेच नियंत्रणासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वीत केली असून मध्यप्रदेश राज्याच्या सिमावर्ती भागात तपासणी नाके उभारण्यात आले आहे. तसेच नाक्यावर परराज्यातून येणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीवर अंकुश ठेवण्यात येत आहे. यासाठी चार निरीक्षकांच्या नियंत्रणाखाली चार पथकांची नेमणुक केली आहे.
 
राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत दि. 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर आचारसंहिता कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील हातभट्टी ठिकाण, अवैध मद्यविक्री केंद्रावर एकूण 99 ठिकाणी छापे टाकून 103 आरोपीना अटक केली असून सदर गुन्हयात एकूण 13 वाहीने जप्त केली असून एकूण 17 लक्ष 65 हजार 20 रुपये ऐवढा मुद्देमाल जप्त करण्यात आले. सदर कारवाई जिल्ह्यातील मौजे बोराखेडी, पाडोळी, मातला, पेसोंडा, चौंडी, बोरी आडगाव, राजूर उमरखेड शिवार, कोलवड इत्यादी ठिकाणी छापे टाकुन केलेली आहे.
 
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात "कोरडे दिवस" पाळण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे. त्यानुसार दि. 18 नोव्हेंबरचे सायंकाळी 5 वाजेपासुन ते 20 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद राहतील. तसेच दि. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस जाहीर करण्यात आलेला आहे. मध्यप्रदेश राज्याच्या सिमावर्ती भागात सुद्धा कोरडा दिवस जाहीर करण्याबाबत बुरहानपुरचे(मध्यप्रदेश) जिल्हाधिकारी यांना पत्र देण्यात आले आहे.
 
बुलढाणा जिल्ह्यात रात्री गस्त घालुन खाजगी वाहने, ट्रॅव्हल्स इत्यादी मधुन अवैध मद्य वाहतुक होऊ नये याकरिता कसुन तपासणी करण्यात येत आहे. सिमावर्ती जिल्ह्याच्या मार्गावर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून मध्यप्रदेश अबकारी विभागासोबत संयुक्त मोहिम राबविण्यात येत आहे. अवैध मद्य विक्रेते, वाहतुक व विक्री करणाऱ्यावर तसेच हॉटेल्स, ढाब्यांची तपासणी करुन ढाबा चालक, मालकांसह त्याठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. अनियमीतता आढळून येणाऱ्या परवानाधारक मद्यविक्री दुकानदारांवरही कारवाई सुरु आहे. नागरीकांनी अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल्स ढाब्यावर जाऊन मद्य सेवन करु नये, असे आवाहन करण्यात येत आहे. अवैध मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल्स, ढाब्याबाबत, अवैध मद्यनिर्मीती वाहतुकीबाबत माहीती देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील टोल फ्री नंबर १८००२३३९९९९ किंवा व्हॉटसअॅप नंबर ८४२२००११३३ वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर तात्काळ माहिती द्यावी.
Powered By Sangraha 9.0