एबी न्यूज नेटवर्क :
प्रवाशांना उत्कुष्ट सेवा देण्याचे ध्येय ठेवणाऱ्या एसटी महामंडळात पर्यावरणपूरक सुविधायुक्त व वातानुकूलीत ९ मीटर लांबीच्या २५ ई- बसेस सेवा देत असताना व ई- बसेस ला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत असतांनाच एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातील ताफ्यात नवीन १२ मीटर लांबीच्या ८ शिवाई-ई बसेस दाखल झालेल्या आहेत. या शिवाई-ई बसेस चा शुभारंभ गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावर करण्यात आला. या प्रसंगी एसटी महामंडळाचे नागपूर व अमरावती प्रदेशाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभणे, नागपूर विभागाचे विभाग नियंत्रक विनोद चवरे यांनी नागपूर ते चंद्रपूर करीता सुटणाऱ्या पहिल्या शिवाई-ई या १२ मीटर लांबीच्या वातानुकूलीत ई-बसला हिरवी झेंडी दाखविली.
या कार्यक्रमाला प्रादेशिक सांख्यिकी अधिकारी किशोर आदमने, विभागीय वाहतुक अधिकारी रंजु घोडमारे, विभागीय अभियंता (स्थापत्य) सतीश कटरे, आगार व्यवस्थापक अभय बोबडे, स्वाती तांबे सहाय्यक वाहतुक अधिक्षक राकेश रामटेके, निलेश बावने, विजय धुंडाते, वाहतूक निरीक्षक गणेश तलमले, अतुल निंबाळकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
एसटी महामंडळाचे नागपूर विभागातील ताफ्यात दाखल झालेल्या सदरच्या ८ ही शिवाई-ई बसेस या नागपूर ते चंद्रपूर मार्गावर धावणार आहेत. सदरच्या शिवाई-ई बसेस या फलाटावर उभ्या होताच प्रवाश्यांनी आनंद व्यक्त करुन भरघोस प्रतिसाद दिल्याने बसेस पूर्ण आसनक्षमतेमध्ये धावल्या.
या शिवाई-ई बसेस या १२ मीटर लांबीच्या असून, आसन क्षमता ही ४४ आसनी आहे. बसमधील आसने ही उत्कृष्ट दर्जाची असुन आरामदायी आहेत. प्रत्येक आसनाच्या बाजुला आपातकालीन स्वतंत्र बटन दिले असुन मोबाईल चार्जीग साठी युएसबी पोर्ट दिलेले आहेत. प्रवाश्यांच्या सुरक्षिततेकरीता बसच्या आत आणि बाहेर कॅमेरे लागलेले असुन फायर सेफ्टी सिलेंडर लावण्यात आलेले आहेत.
शिवाई-ई या वातानुकुलीत ई-बस मध्ये महिला तसेच ०५ ते १२ वर्षापर्यंत च्या मुलांना अर्धे तिकीट अनुज्ञेय असुन अमृत जेष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक, अर्जुन द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त पूरस्कारार्थी, विदयमान तसेच माजी विधानसभा, विधान परिषद सदस्य तसेच शहीद सन्मान योजने अंतर्गत शहीद जवानांच्या वीरपत्नी यांना ही सवलती लागू राहणार आहेत. एक चांगली व आरामदायी सेवा सवलतीसह मिळणार असल्याने प्रवाश्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे.