अभ्युदय : सेवा प्रदर्शनात एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी

    06-Nov-2024
Total Views |

Job opportunities for MSW students at Abhyudaya sewa exhibition
(Image Source : Internet/ Representative)
 
एबी न्यूज नेटवर्क :
ग्रामायण प्रतिष्ठान सेवा संस्थांना अधिक सशक्त करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. यावेळी प्रतिष्ठानने एक विशेष उपक्रम आयोजित केला आहे - अभ्युदय: सेवा कार्याचे निःशुल्क प्रदर्शन. "चांगल्या कामांना समाजाची साथ!" या संकल्पनेवर आधारित, नागपूरमध्ये बहुतेक पहिल्यांदाच अशा प्रकारचे प्रदर्शन होत आहे. 9 नोव्हेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते सकाळी 11.30 वाजता उद्घाटन होईल.अशी माहिती ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे.
 
फ्रेंड्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या संयुक्त सहकार्याने आयोजित या प्रदर्शनात महाराष्ट्रातील विविध 40 हून अधिक संस्थांचा सहभाग राहणार आहे. यात संस्थांना त्यांच्या कार्याची माहिती देण्याची संधी मिळेल. तसेच, संस्थांचे डायरेक्टर्स, CSR देणगीदार, समाजातील हितचिंतक आणि विविध महाविद्यालयांतील BSW, MSW विद्यार्थी या कार्यक्रमाला भेट देतील. विशेष म्हणजे, भेट देणाऱ्या एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. सहभागी संस्थांना विद्यार्थ्यांचे resumes/interviews घेण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. विद्यार्थ्यांना या प्रदर्शनातून सामाजिक कार्याची जवळून ओळख होईल, तसेच त्यांना त्यांच्या आवडीच्या संस्थेसोबत काम करण्याची संधी मिळू शकेल.
 

Job opportunities for MSW students at Abhyudaya sewa exhibition 
 
सीएसआर फंड देणाऱ्या उद्योगांना उत्तम काम प्रत्यक्ष पाहून त्यातून निवड करण्याची संधी आहे. अनेक सरकारी व कॉर्पोरेट क्षेत्रातील उद्योग वरिष्ठ नेतृत्व या प्रदर्शनाला भेट देणार आहेत. या उपक्रमाच्या निमित्ताने विविध संस्थांचा आणि देणगीदारांचा प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. समाजाच्या विविध क्षेत्रांतील सेवा कार्याला आर्थिक आणि सामाजिक पाठबळ मिळवून देण्याचा हा प्रयत्न आहे. प्रदर्शनात विविध सामाजिक संस्थांनी सहभागी होण्याची तयारी दाखवली आहे, त्यात पारधी समाजाचे कल्याण, एचआयव्ही बाधित मुलांचे पुनर्वसन, रस्त्यावरील मुलांचे शिक्षण, मनोरुग्णांचे पुनर्वसन, कुमारी माता आणि विधवांसाठी कार्य, जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण, व्यसनमुक्ती, गोसेवा, दिव्यांग सहाय्य आणि आदिवासी क्षेत्रातील कार्य अशा संस्थांचा समावेश आहे.
 
हे प्रदर्शन 9 व 10 नोव्हेंबर 2024 रोजी, दुपारी 12 ते रात्री 9 या वेळेत तात्या टोपे सभागृह, तात्या टोपेनगर, नागपूर येथे भरविण्यात येईल. विदर्भातील निवडक दिवंगत सेवाव्रतींच्या कार्याची सचित्र माहितीही प्रदर्शनात ठेवली जाणार आहे, जेणेकरून नवीन पिढीला त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल. नागपूरकरांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट देऊन समाजात होणाऱ्या विविध सेवा कार्यांची माहिती घ्यावी, असे आवाहन ग्रामायण प्रतिष्ठानने केले आहे.