नागपूर :
समर्थ सद्गुरू श्री सीताराम महाराज दत्त दरबारतर्फे 10 ते 13 नोव्हेंबर असे सलग चार दिवस चातुर्मास्य कार्तिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी चातुर्मासातील अखंड श्रीगुरुचरित्र सप्ताहनुष्ठान समाप्ती, तसेच कार्तिकोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
195, रेशीमबाग लेआऊट येथे आयोजित कार्यक्रमांची सुरुवात दररोज सकाळी 5.30 वाजता काकडआरतीने, तर समापन 5.30 वाजता दरबारच्या आरतीने होईल. यात रविवार, 10 रोजी सकाळी 10 वाजता श्रींना रूद्राभिषेक आणि संध्याकाळी 7 वाजता डॉ. कल्याणी देशमुख या गायनसेवा देणार आहेत. सोमवार, 11 रोजी रात्री 7 वाजता डॉ. सानिका रुईकर आणि विशाखा मंगदे यांचे भक्तिगीत गायन होईल. मंगळवार, 12 रोजी सकाळी 9 वाजता वे.शा.सं. भूषणशास्त्री आर्वीकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सत्यदत्त सामूहिक पूजन, दुपारी 4 वाजता दिलीप देशपांडे यांचे ‘श्री ज्ञानदेवकृत हरिपाठ अंतरंग’ या विषयावर प्रवचन, रात्री 8 वाजता श्रीदत्तदरबार, श्री शिवपंचायतन, श्रीगोपाळकृष्ण मंदिरचे भक्तगण भजन कल्लोळ सादर करणार आहेत. बुधवार, 13 रोजी सकाळी 9.30 वाजता अनंत महाराज पाखोडे यांचे गोपाळकाला वारकरी कीर्तन आणि दहिहंडी होईल. यानंतर महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
चार दिवस होणार्या विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री समर्थ सद्गुरू सीताराम महाराज दत्तदरबार ट्रस्ट, नागपूर यांनी केले आहे.