छत्रपती संभाजी महाराजांची वीर गाथा सांगणारं ‘राजं संभाजी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
04-Nov-2024
Total Views |
(Image Source : Agency)
मुंबई :
संदीप रघुनाथराव मोहिते-पाटील प्रस्तुत व उर्विता प्रॉडक्शन निर्मित ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपटातील बहुप्रतीक्षित टायटल सॉंग ‘राजं संभाजी’ आता रसिकांच्या भेटीस आले आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार आहे. हे गाणं नंदेश उमप यांनी गायले असून मोहित कुलकर्णी यांचे संगीत आहे व गाण्याचे गीतकार हृषिकेश झांबरे आहेत.
हे गाणं आपल्या राष्ट्रवीर आणि हिंदवी स्वराज्याचे संरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असून, त्यांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा गौरव साजरा करतो. या गाण्यात उत्तम कलाकारांची तगडी फौज आहे ज्यामध्ये ठाकूर अनुप सिंग, अमृता खानविलकर, किशोरी शहाणे, भार्गवी चिरमुले, आणि मल्हार मोहिते-पाटील हे महत्वाच्या भूमिकेत आहेत.
चित्रपटाबद्दल निर्माते संदीप रघुनाथ मोहिते-पाटील म्हणतात, 'छत्रपती संभाजी महाराज हे केवळ इतिहासातील नायक नसून ते आजही प्रेरणादायी आहेत. ‘राजं संभाजी’ हे गाणं त्यांचं धैर्य, त्याग आणि आदर्श जपण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत महाराजांच्या शौर्यगाथेचा संदेश पोहोचेल.'
चित्रपटाचे दिग्दर्शक तुषार शेलार म्हणतात, राजं संभाजी’ हे गाणं चित्रपटाच्या हृदयाशी जोडलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या धैर्यशील व्यक्तिमत्त्वाला आणि त्यांच्या अभूतपूर्व पराक्रमाला संगीताच्या रूपात साजरं करणं हे आमच्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. या गाण्यातून त्यांची वीरता, निष्ठा आणि संघर्ष रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. मला खात्री आहे राज संभाजी गाणं प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करेल.
धर्म आणि स्वराज्यासाठी समर्पित असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय कार्याची गाथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘राजा संभाजी’ हे गाणं महानायकाच्या शौर्यला सन्मान देणारे ठरेल.
संदीप रघुनाथ मोहिते पाटील प्रस्तुत व उर्विता प्रोडक्शन निर्मित ‘धर्मरक्षक महावीर संभाजी महाराज’ चित्रपटाची निर्मिती शेखर मोहिते पाटील, सौजन्य निकम आणि केतन राजे भोसले यांनी केली आहे. येत्या २२ नोव्हेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.