मुख्यमंत्रिपदाचा संभ्रम संपणार? एकनाथ शिंदे आज घेणार महत्त्वाचा निर्णय

    30-Nov-2024
Total Views |
Eknath Shinde will take an important decision today
 (Image Source : Internet)
 
मुंबई :
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय 1 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. महायुतीत मुख्यमंत्रिपदासाठी संभ्रम कायम असून आतापर्यंत अनेक बैठका झाल्या आहेत, पण अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. एकनाथ शिंदे हे सध्या प्रकृती अस्वस्थ असल्याने साताऱ्याला गेले आहेत. शिंदे नेहमी महत्त्वाचे निर्णय घेण्याआधी साताऱ्याला जातात आणि परत येऊन निर्णय जाहीर करतात. त्यामुळे ते परतल्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत काही महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
 
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे प्रबळ दावेदार आहेत. मात्र, शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद भूषवणार नसल्याचे संकेत दिले असून, त्यांचा बॅकअप प्लॅन तयार असल्याचे समजते. मुख्यमंत्रिपद न मिळाल्यास शिंदे गृहमंत्रिपद स्वीकारू शकतात, असे म्हटले जात आहे. 1 डिसेंबरला महायुतीची बैठक होणार असून त्यात मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होणार आहे. दिल्लीहून येणाऱ्या निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होईल आणि त्यानंतर महायुतीची संयुक्त बैठक घेतली जाईल. त्या बैठकीत मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा होणार असल्याचे सांगितले जात आहे.