Bhai Dooj 2024 : जाणून घ्या भाऊ यमराज आणि बहीण यमुनाची कथा

03 Nov 2024 08:14:16

Story of brother Yamraj and sister Yamuna
 (Image Source : Internet/ Representative)
 
नागपूर :
दरवर्षी कार्तिक मासातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज हा सण साजरा केला जातो. याला यम द्वितीया असेही म्हणतात. हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या विशेष प्रसंगी बहिण आपल्या भावाला टिळक लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करते. पंचांगानुसार, यावर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाची दुसरी तिथी 2 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 8:21 वाजता सुरू होईल. तथापि, ही तिथी 3 नोव्हेंबर 2024 रोजी संपेल. कॅलेंडरवर आधारित, यावर्षी भाऊबीजेचा सण रविवार, 3 नोव्हेंबर 2024 रोजी साजरा केला जाईल.
 
दिवाळीच्या ५ दिवसीय उत्सवात पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज. रक्षाबंधनाप्रमाणेच भाऊबीजेचा सण देखील बहीण-भावाचे सुंदर नाते, प्रेम आणि आपुलकीचा प्रतीक आहे. आजच्या दिवशी बहीण सर्वप्रथम चंद्राची पूजा करते आणि नंतर आपल्या भावाला ओवाळून, टिळक लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. तसेच भाऊ देखील आपल्या लाडक्या बहिणीला भेटवस्तू देतो.
 

Bhai Dooj 2024 
  
भाऊबीज हा सण देशाच्या वेगवेगळ्या भागात विविध नावाने ओळखला जातो. भाई दूज, भाई टिका, यम द्वितीया, भत्री द्वितीया या नावाने देखील या सणाला ओळखले जाते. भाऊबीजे च्या दिवशी बहिणी आपल्या भावांना तिलक लावून आरती करतात आणि त्यांच्या दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि जीवनात यशाच्या भरभराटीसाठी प्रार्थना करतात. यानंतर भाऊ बहिणींना भेटवस्तू देतात.
 
भाऊ यमराज आणि बहीण यमुनाची कथा
पौराणिक मान्यतेनुसार, भाऊबीजेच्या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या आमंत्रणावरून तिच्या घरी भोजनासाठी येतात. म्हणून या दिवशी मृत्यूचे देवता यमराज आणि यमुना यांची पूजा करण्याची मान्यता आहे. पौराणिक कथेनुसार, भाऊबीजेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीच्या आमंत्रणावर यमुनाच्या घरी गेले आणि तेथे त्यांनी भोजन केले. तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीजेची परंपरा सुरू झाली. असे म्हटले जाते की, यमराज आपल्या कामात व्यस्त असल्यामुळे यमुनाच्या घरी येण्याचे आमंत्रण वारंवार टाळत असायचे. मात्र, यमराज घरी पोहोचल्यावर बहीण यमुना कपाळावर टिळक लावून भाऊ यमराजाची आरती करते आणि भोजन करताना भावाच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करते. यानंतर भाऊ यमराजने बहिणीला वरदान दिले आणि सांगितले की, 'दरवर्षी या तिथीला जी बहीण घरी येऊन भावाच्या कपाळावर टिळक लावेल, त्या भावाला दीर्घायुष्य लाभेल.' तेव्हापासून भाऊबीज उत्सव सुरू झाला. मान्यतेनुसार या दिवशी यमुना नदीत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे.
 
 
 
Disclaimer : या लेखातील माहितीची आणि कथांच्या अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची हमी दिलेली नाही. ही माहिती विविध माध्यमांतून/ पौराणिक कथा/ शास्त्रानुसार एकत्रित करून तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आमचा उद्देश केवळ माहिती प्रसारित करणे असून वाचकाने ती केवळ माहिती म्हणून घ्यावी.
Powered By Sangraha 9.0