(Image Source : Internet/ Representative)
नागपूर :
राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आता दुचाकीचालकासह मागे बसलेल्या व्यक्तीला देखील हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. नागपुरातही याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जर मागे बसलेली हेल्मेट घालून नसेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. पोलिस जागोजागी अशा दुचाकीस्वारांवर कॅमेऱ्यांद्वारे देखील नजर ठेवणार असून अशा चालकांना थेट ई- चालान पाठविण्यात येणार आहे.
राज्याचे अपर पोलिस महासंचालक अरविंद साळवे यांनी हेल्मेट सक्तीसंदर्भात निर्देश जारी केले होते. वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांचा होणारा मृत्यू आणि गंभीर दुखापत याला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, दुचाकीस्वार आणि त्याच्यामागे बसलेल्या प्रवाशाने हेल्मेट वापरले नाही तर, त्यांच्याविरोधात कारवाई केली जाणार असून ई-चालान पाठवण्यात येणार आहे. नागपूर पोलिसांनी देखील हे आदेश गंभीरतेने घेतले आहेत. वाहतूक पोलिस उपायुक्त अर्चित चांडक यांनी याबाबत सूचना जारी केल्या आहेत.
मोटार वाहन कायद्यातील कलम १२८ व १२९ मधील तरतुदीनुसार दुचाकीस्वारासोबतच मागे बसलेल्या प्रवाशालादेखील सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट घालणे आवश्यक आहे. मात्र, हेल्मेट न घातल्यामुळे अपघाती मृत्यू व जखमींच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कायद्याच्या सक्तीने अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यामुळे वाहन चालविताना दुचाकीवरील दोन्ही व्यक्तींनी हेल्मेट घातले नसेल तर कारवाई करण्यात येईल, असे अर्चित चांडक यांनी स्पष्ट केले आहे.