(Image Source : Internet)
मुंबई :
महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा तिढा कायम असून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय लांबणीवर गेला आहे. मुंबईत शुक्रवारी होणारी शिखर बैठक रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांसाठी सातारा येथे त्यांच्या गावी गेले असल्याने ही बैठक रद्द झाल्याची माहिती आहे.
गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सहभागी होते. मात्र, आज होणाऱ्या शिखर बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा निर्णय अपेक्षित होता, तो आता लांबणीवर गेला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद नाकारले असून गृह आणि नगरविकास मंत्रालय देण्याची मागणी केली आहे. तसेच, अजित पवारांनी केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केल्याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिल्याने महायुतीतील गोंधळ वाढला आहे. शिंदेंच्या जागी पक्षातील वरिष्ठ नेत्याचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची चर्चा आहे.