नागपूर :
कन्हान कांद्री कोळसा खाण परिसरातील उपकेंद्राजवळ दिसलेल्या एका महाकाय गिधाडाला वाईल्डलाईफ वेलफेअर सोसायटीच्या सदस्यांनी जीवनदान दिले आहे. या कारवाईनंतर गिधडाच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या वाईल्डलाईफ वेलफेअर सोसायटीच्या सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले.
गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास कोळसा खाणीतील कामगार गस्त घालत असताना त्यांना एक मोठा पक्षी दिसला. त्यांनी तत्काळ याची माहिती कन्हानच्या वाईल्डलाइफ वेलफेअर सोसायटीचे सदस्य आशिष मेश्राम व बबलू मुलुंडे यांना दिली. यानंतर सोसायटीचे सदस्य तात्काळ खदान परिसरात पोहोचले आणि त्यांना तेथे एक मोठे गिधाड दिसले. गिधाडाच्या शरीराला ट्रॅकर जोडण्यात आला होता. त्यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली.
खाणीत जाऊन गिधाड अडचणीत येऊ शकते. याचा संशय आल्याने सदस्यांनी त्याला सुखरूप पकडून वनविभागामार्फत ट्रान्झिस्टर उपचार केंद्रात पाठवले. या कारवाईत चंद्रशेखर बोरकर, आशीष मेश्राम, बबलू मुलुंडे, रोहित फरकसे, गुड्डू नेहाल, अंकेश, दीपक, गोपाल बिसेन, मनीष नंदेश्वर आणि प्रवेश डोंगरे यांचे मोलाचे योगदान होते.