खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव झाला ‘आयकॉनिक’ - अजय संचेती

28 Nov 2024 17:59:46

- कार्यालयाचे उद्घाटन व कार्यक्रम स्‍थळाचे भूमिपूजन संपन्‍न

bhoomipujan of khasdar sanskrutik mahotsav program venue completed 
 
नागपूर :
नागपूरच्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे (Khasdar Sanskrutik Mahotsav) यशस्वी आयोजन बघून अनेक खासदारांनी आपापल्या शहरांमध्ये अशाप्रकारच्या महोत्सवाचे आयोजन सुरू केले आहे. सामान्यांपर्यंत हे मनोरंजन पोहोचविणे याकरिता नितीन गडकरी यांच्‍या विशेष प्रयत्‍नातून सुरू झालेला हा महोत्‍सव ‘आयकॉनिक’ ठरला आहे, असे मत माजी खा. अजय संचेती यांनी व्‍यक्‍त केले.
 
खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे 13 ते 22 डिसेंबर होणार्‍या खासदार सांस्‍कृतिक महोत्सव - 2024 च्या कार्यालयाचे उद्घाटन व कार्यक्रम स्थळाचे भूमिपूजन गुरुवारी थाटात पार पडले. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्‍या या कार्यक्रमात माजी खासदार अजय संचेती, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह प्रा. अतुल मोघे, खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले व इतर मान्‍यवरांच्‍या हस्ते मंत्रोच्चारात कुदळ मारून भूमिपूजन करण्‍यात आले. तसेच, फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
 
यावेळी नवनिर्वाचित आमदार प्रवीण दटके, भाजपाचे संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, महोत्सव समितीचे उपाध्यक्ष डॉ. दीपक खिरवडकर, उपाध्यक्ष दिलीप जाधव, सदस्य आशिष वांदिले, सचिव जयप्रकाश गुप्ता, हडस हायस्कूलचे सचिव, निलेश साठे, नागपूर नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
प्रास्ताविकातून प्रा. अनिल सोले यांनी या महोत्सवात 13 ते 22 डिसेंबर या दरम्यान सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात होणार्‍या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. हा महोत्सव उत्कृष्ठरित्या पार पाडण्याकरिता 1000 कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असल्याचे ते म्‍हणाले.
 
प्रा. अतुल मोघे म्हणाले, 2017 पासून दरवर्षी होणारा हा महोत्सव नागपूरची शान आहे. जुन्‍या-नवीन परंपरांची अतिशय चांगली सांगड घालणारा हा कार्यक्रम असल्याने फक्त नागपूरच नव्हे तर आसपासच्या शहरातूनही लोक या कार्यक्रमाचा आस्‍वाद घेण्‍यासाठी येतात. सकाळच्या सत्रात संस्कारक्षम कार्यक्रम, तर संध्याकाळी मनोरंजन आणि ज्ञानप्रबोधन अशी कार्यक्रमांची रेलचेल आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या महोत्सवामुळे आज सांस्कृतिक शहर अशी नागपूरची ओळख निर्माण होणार असल्याचे ते म्हणाले.
 
कार्यक्रमाचे संचालन बाळासाहेब कुळकर्णी यांनी केले तर जयप्रकाश गुप्ता यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महोत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0