- एमकेएम डिफेंडर्स व राजमुद्रा वॉरियर्समध्ये चुरस
- ‘खो-खो प्रिमियर लीग - 2024’ रोमांचक वळणावर
नागपूर :
महाराष्ट्र क्रीडा मंडळाद्वारे नागपुरात सुरू असलेल्या ‘एमकेएम खो-खो प्रिमियर लीग - 2024’ (MKM Kho Kho Premier League 2024) मध्ये व्हीडीएल फ्लायर्सने सामने सलग चार सामने जिंकून सर्वाधिक 12 गुण प्राप्त करीत अंतिम फेरी गाठली आहे.
न्यू इंग्लिश हायस्कूल, कॉंग्रेस नगर येथील मैदानावर दोन दिवसांपासून सुरू असलेल्या प्रिमियर लीगमध्ये सर्व सहाही संघांनी आतापर्यंत 4 सामने खेळले असून त्यात व्हीडीएल फ्लायर्सने बाजी मारली आहे तर एमकेएम डिफेंडर्स संघ 10 गुणांसह दुस-या क्रमांकावर राहिला आहे.
शनिवारी एमकेएम डिफेंडर्स आणि राजमुद्रा वॉरियर्स यांच्यात झालेला सामना अनिर्णित राहिल्यामुळे दोन्ही संघांना 1-1 गुणांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे तीन सामने जिंकलेल्या व एक सामना टाय झालेल्या एमकेएम डिफेंडर्स गुणतालिकेत 10 गुण घेऊन दुस-या क्रमांकावर राहिला. राजमुद्रा वॉरिसर्य दोन सामने जिंकत व एक सामना टाय करीत 7 गुणासह तिस-या क्रमांकावर राहिला तर दोन सामने जिंकलेला स्पोर्ट्स कर्माने चौथे स्थान पटकावले. किंग्ज्स छत्रपती आणि आर्या फायटर्स या दोन्ही संघाना चारही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे हे दोन्ही संघ गुणतालिकेत आपले खाते उघडू शकले नाही. रविवारी होणा-या शेवटच्या लीग सामन्यात हे दोन्ही संघ आपले खाते उघडू शकतात का, हे बघणे महत्वाचे ठरेल.
शेवटच्या टप्प्यातील लीग सामन्यांमध्ये व्हीडीएल फ्लायर्स व एमकेएम डिफेंडर्स समारोसमोर असून यात व्हीडीएल फ्लायर्स जिंकल्यास सर्वाधिक 15 गुण प्राप्त करेल व एमकेएम डिफेंडर्स 10 गुणांवर राहील. अशावेळी राजमुद्रा वॉरियर्स व स्पोर्ट्स कर्मा यांच्यातील लढतीत राजमुद्रा वॉरियर्स जिंकल्यास त्यांना त्यालाही 10 गुण मिळतील. त्यामुळे एमकेएम डिफेंडर्स व राजमुद्रा वॉरियर्स मध्ये टाय होईल. या दोन्ही संघाना आणखी एक सामना खेळावा लागेल. त्यातून जिंकलेला संघ विजेतेपदासाठी व्हीडीएल फ्लायर्स सोबत लढेल. पण व्हीडीएल फ्लायर्सचा पराभव झाल्यास त्यांची विजेतेपदासाठी थेट एमकेएम डिफेंडर्स सोबत लढत होईल आणि राजमुद्रा व स्पोर्ट्स कर्मा तृतीय क्रमांकाकरिता लढतील.