नागपूर :
नागपुरातील काही तरुणांना हातात तलवारी घेऊन त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणे चांगलेच भोवले आहे. पोलिसांकडे हा व्हिडिओ आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची दखल घेत ३ आरोपींना अटक केली आहे. नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्यांतर्गत हा प्रकार उघडकीस आला आहे.
कळमना पोलिसांकडे तीन दिवसांपूर्वी ५ मुलांचा हातात तलवारी घेऊन असलेला एक व्हिडिओ आला होता. ही मुलं सोशल मीडियावर अशाप्रकारचा व्हिडिओ टाकून दहशत पसरवण्याचे काम करत होते. या प्रकरणी पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली असून अन्य दोन मुले अल्पवयीन आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तलवारीही जप्त केल्या आहेत.
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओची माहिती कळमना पोलिसांना मिळाली होती. ही बाब गांभीर्याने घेत पोलिसांनी तपास केला असता, व्हिडिओमध्ये दिसणारे सर्व तरुण कळमना पोलिस ठाण्याच्या आवारातच राहत असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी या पाच तरुणांना शोधून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या घरांची तपासणी केली असता पोलिसांना सहा तलवारीही सापडल्या. अटक करण्यात आलेल्या या तरुणांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. दरम्यान, या प्रकारचे शस्त्र हातात घेऊन सोशल मीडियावर दहशत न पसरवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.