नागपूर :
गिट्टीखदानमधील एका घरावर गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने छापा टाकत ४.७१ लाखांहून अधिकचे प्रतिबंधित गुटखा-तंबाकू आणि पान मसाले जप्त केले आहेत. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून २ आरोपी फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राजेंद्र शुक्ला असून तो गिट्टीखदाचा रहिवासी आहे, तर फरार आरोपी संजय जयस्वाल आणि कुंजबिहारी ठाकूर हे ओम नगर, कोराडीचे राहणारे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गस्तीदरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट 5 च्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून प्लॉट क्रमांक 96, आदर्श नगर, गिट्टीखदान येथील घरावर छापा टाकला. या घरातील रहिवासी राजेंद्र शुक्ला यांच्या ताब्यातून प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू रजनीगंधा, बागबान, बाबा-120, राजश्री, रत्ना, सागर, विमल पान मसाला व इतर विविध प्रकारचा सुगंधित तंबाखू व पान मसाला जप्त करण्यात आला. मालाची किंमत सुमारे 4 लाख 71 हजार 989 रुपये आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५), कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने माल जप्त केला असून आरोपीला गिट्टीखदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.