नागपूर : उपराजधानी नागपूरची नगरदेवी म्हणून प्रख्यात असलेले आग्याराम देवी मंदिर नागपूरकरांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराला नागपूरकर भोसलेंच्या रूपाने खूप मोठा पुरातन इतिहास लाभला आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात लाखो भाविक आग्याराम देवीच्या दर्शनासाठी मंदिरात येत असतात. दुःख निवारणी आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी अशी आग्याराम देवीची ओळख आहे. अश्विन शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात हजारोंच्या संख्येने अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात येते.
आग्याराम देवी मंदिराला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. गोंड, नागपुरकर रघुजी महाराज यांच्या काळातही हे श्रद्धास्थान होते. मंदिरातील मूर्ती ही मंदिराच्या मागील भागात खोदकाम करताना सापडली होती. नंतर त्याजागी देवीचे भव्य मंदिर उभारण्यात आले, असे सांगितले जाते. मंदिरातील प्रभावळ आणि देवीवरील दागिने हे चांदीचे असून त्यात देवी अतिशय विलोभनीय दिसते.
नागपुरातील हे खूप पुरातन मंदिर असल्याने याठिकाणी लोकांची प्रचंड श्रद्धा आहे. त्यामुळे मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याचे मंदिराचे विश्वस्त सांगतात.
मनोकामना ज्योत पाहण्यासाठी गर्दी
दरवर्षी नवरात्र निमित्त मंदिरात मनोकामना ज्योत प्रज्वलित केली जाते. त्यासाठी मोठा हॉल निर्माण करण्यात आला आहे. या हॉलमध्ये ३००१ अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित केल्या जातात. आग्याराम देवीचे मंदिर सकाळी ४ वाजता सर्वांसाठी खुले होत असून ५.३० वाजता आरती केली जाते. दिवसभर मंदिर खुले राहत असून रात्री 12 ते 1 दरम्यान केवळ साफसफाई करता बंद केले जाते. एक तास वगळता नवरात्राच्या ९ दिवसांमध्ये मंदिर २३ तास खुले असते, अशी माहिती विश्वस्तांनी दिली.