जागतिक इंटरनेट दिन

    29-Oct-2024
Total Views |

World Internet Day
(Image Source : Internet/ Representative)
 
आजचे युग हे इंटरनेटचे युग आहे. इंटरनेट आज सर्वांच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. इंटरनेट शिवाय कोणी राहू शकत नाही एकवेळ माणूस अन्नापाण्याशिवाय राहील पण इंटरनेटशिवाय नाही इतकी इंटरनेट आज जीवनावश्यक गोष्ट बनली आहे. आपला इंटरनेट पॅक अचानक संपला तर आपली काय अवस्था होते हे तपासून पहा. असं कोणतेच क्षेत्र नाही जिथे इंटरनेटचा वापर होत नाही सर्वच क्षेत्रात इंटरनेटचा वापर केला जातो म्हणूनच इंटरनेट आपल्या जीवनातील अविभाज्य भाग बनला आहे.
 
भारतात १९९५ च्या सुमारास इंटरनेट उपलब्ध झालं, मात्र असलं तरी त्याच्या कितीतरी आधी अमेरिकेत आणि युरोपात इंटरनेटचा वापर केला जात होता. २९ ऑक्टोबर १९६९ रोजी इंटरनेटवरचा पहिला संदेश पाठवला गेला म्हणूनच २९ ऑक्टोबर हा दिवस जागतिक इंटरनेट दिवस म्हणून मानला जातो. इंटरनेटवर पहिला संदेश पाठवला त्याला आज बरोबर ५५ वर्ष पूर्ण झाली. या ५५ वर्षात इंटरनेटमुळे जगात अनेक क्रांतिकारी बदल झाले मात्र इंटरनेटवर पहिला संदेश कसा पाठवला गेला हे पाहणे खूप मनोरंजक आहे.
 
१९६० चा दशकात अमेरिका आणि रशिया यांच्यात शीतयुद्ध चालू होते. अमेरिकन सैन्याला इंटरनेट व्यवस्था सारखी गुप्त व्यवस्था संदेशवहनासाठी हवी होती. अशी यंत्रणा स्थापन करण्यासाठी अमेरिकन संरक्षण खात्याने एका संशोधन प्रकल्पाला मोठ अर्थसहाय्य देऊन अमेरिकेतील काही विद्यापीठाकडे त्या संशोधनाचे काम सोपवल. या प्रकल्पासाठी एकूण चार संगणक अमेरिकेतील चार विद्यापीठात जोडण्यात आले. त्या चार संगणकातच जगातील पहिलं इंटरनेट होत. या चार संगणकांपैकी एक होता कोलिफॉर्निया लॉस एंजेलिस विद्यापीठात, दुसरा होता स्टॅनफोर्ड विद्यापीठात तिसरा होता सांता बार्बरा विद्यापीठात तर चौथा होता उता विद्यापीठात. एका संगणकातून दिला जाणारा संदेश इंटरनेटद्वारे दुसऱ्या संगणकात पोहचतो असे संशोधन या प्रकल्पातील तज्ज्ञांनी केले होते त्याची चाचणी या चार संगणकाद्वारे केली जाणार होती. अर्थात त्याकाळी आजच्या इतके प्रगत तंत्रज्ञाान नव्हते. संगणकाचे मॉनिटर तर हिरव्याजर्द अक्षरांनी चमकणारे असत.
 
कॉलिफॉर्नियामध्ये चार्ली क्लीने या संगणकप्रणाली निर्मात्याने एका संगणकावरून दुसऱ्या संगणकाला एकेक्ट्रोनिक संदेश पाठवला. पहिल्या वेळी पाठवलेल्या log in शब्दापैकी lo शब्द पोहचल्यावर सिस्टीम फेल झाली. पुढील अक्षरे पोहचू शकली नाहीत. मात्र अर्धवट का होईना संदेश पोहचला ही बाब दूरसंचार आणि तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवणारी ठरली. हा दिवस माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सुवर्ण दिन ठरला. म्हणूनच २९ ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण जगात जागतिक इंटरनेट दिन म्हणून साजरा केला जातो.
 
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.