भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा!

27 Oct 2024 18:09:05

Make arrangements for stray dogs
 (Image Source : Internet/ Representative)
 
 
मागील वर्षी बाघ बकरी चहा कंपनीचे संचालक पराग देसाई यांचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. पराग देसाई यांचा असा वेदनादायी अंत खरोखरीच दुर्दैवी होता. पराग देसाई यांच्या मृत्यूनंतर भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. पराग देसाई यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यावर स्वतःचा बचाव करताना पराग देसाई अडखळून पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. पराग देसाई यांचा मृत्यूने संपूर्ण राज्य हळहळले.
 
पराग देसाई हे प्रसिद्ध उद्योगपती होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची बातमी झाली. न्युज चॅनलवर त्याची ब्रेकिंग न्युज झळकली होती तेव्हा अशी अपेक्षा होती की भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनातर्फे ठोस पावले उचलण्यात येतील. मात्र ही अपेक्षा फोल ठरली. कारण भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनातर्फे कोणतेही ठोस पावले उचलण्यात आली नाहीत. उलट भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढतच चालला आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेले पराग देसाई हे देशातील पहिले व्यक्ती नसून याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत.
 
आपल्या देशात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दररोज सहा हजारांहून अधिक लोक जखमी होतात, अशी सरकारी आकडेवारी आहे. दररोज सहा हजारांहून अधिक लोक जर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होत असेल तर ती मोठी गंभीर बाब आहे. केवळ शहरातच नाही देशातील गावागावात भटक्या कुत्र्यांची मोठी दहशत आहे. गाव असो वा शहर, चाळ असो वा सोसायटी, पायवाट असो वा महामार्ग, चौक असो वा नाका सर्वत्र तुम्हाला भटक्या कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी उभ्या असलेल्या दिसतील. हे भटके कुत्रे रस्त्यांवरून जाणाऱ्या लोकांवर अचानक हल्ला करतात. विशेषतः शाळकरी मुले, वृध्द, अपंग व महिलांना भटके कुत्रे टार्गेट करतात. दबा धरून बसलेले भटके कुत्रे अचानक घेराव घालून हल्ला करतात. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लोक अक्षरशः रक्तबंबाळ होतात.
 
भटक्या कुत्र्यांच्या चावण्याने रेबीज नावाचा रोग होतो, या रोगावर जर वेळीच उपचार केला नाही तर रोगी दगावण्याची देखील शक्यता असते. मात्र अनेक सरकारी रुग्णालयात रेबीज वरील लसच उपलब्ध नसते. ग्रामीण भागात तर हे नेहमीचेच चित्र आहे. भटक्या कुत्र्यांची दहशत केवळ रस्त्यांवरून जाणाऱ्या लोकानांच आहे, असे नाही तर पाळीव प्राण्यांना देखील आहे. शेळी, मेंढी, कोंबड्या यासारख्या पाळीव प्राण्यांवर देखील भटकी कुत्री हल्ले करतात. भटक्या कुत्र्यांच्या झुंडी अचानक येऊन पाळीव प्राण्यांचा फडशा पाडतात.
 
भटक्या कुत्र्यांचा त्रास वाहन चालकांना देखील होतो. विशेषतः दुचाकी स्वारांना भटके कुत्र्यांची मोठी दहशत आहे. रस्त्यांवर दुचाकी दिसली की भटके कुत्रे वाहनांच्या मागे धावतात, वाहनांना आडवे येतात त्यामुळे बऱ्याचदा अपघात होतो आणि त्या अपघातात वाहन चालक जखमी होतात त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांकडून होत असते मात्र त्यावर प्रशासन गंभीर नसते. खूपच मागणी झाली किंवा प्रसार माध्यमातून आवाज उठवला तर दिखाव्यासाठी कारवाई केली जाते. भटक्या कुत्र्यांचे निर्बिजिकरण नियमित केले जाते असे प्रशासनामार्फत सांगितले जाते मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे. जर भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण नियमित केले जाते तर मग देशातील भटक्या कुत्र्यांची संख्या का वाढत आहे असा प्रश्न आहे.
 
एकट्या मुंबई शहराचे उदाहरण घेऊ. २०१४ साली मुंबईत ९५ हजार भटकी कुत्री होती आज त्यांची संख्या १ लाख ६४ हजार इतकी आहे याचाच अर्थ मागील , नऊ वर्षात मुंबईतील भटक्या कुत्र्यांची संख्या ७२ टक्क्यांनी वाढली. जर भटक्या कुत्र्यांची संख्या अशीच वाढत राहिली आणि त्यांचे नागरिकांवर होणारे हल्ले देखील वाढत राहिले तर भविष्यात मानव विरुद्ध भटकी कुत्री असा संघर्ष निर्माण होऊ शकतो तो होऊ द्यायचा नसेल तर शासन, प्रशासनाने भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी ठोस उपाय योजायला हवेत. केवळ निर्बिजीकरण केल्याने भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होणार नाही हे सिद्ध झाले आहे.
 
प्राणीमित्र संघटनांनीही या प्रश्नाकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहायला हवे. भटक्या कुत्र्यांना सहानुभूती दाखवताना त्यांच्या हल्ल्यात जखमी होणाऱ्या नागरिकांकडे देखील सहानुभूतीने पाहायला हवे. आपल्या देशात २००१ साली प्राणी कल्याण कायदा लागू झाला या कायद्यानुसार भटक्या कुत्र्यांना संरक्षण मिळाले. भटक्या कुत्र्यांना ते आहेत त्या ठिकणापासून कोणीही हलवू शकत नाही शिवाय त्यांना त्याच ठिकाणी खायला घालणे अनिवार्य करण्यात आले. या कायद्यामुळे भटक्या कुत्र्यांना तर संरक्षण मिळाले पण नागरिकांना भटक्या कुत्र्यांपासून होणारा उपद्रव वाढला. भविष्यात हा उपद्रव आणखी वाढणार आहे . म्हणूनच या कायद्याचा मान राखून नागरिकांना भटक्या कुत्र्यांपासून होणारा उपद्रव कसा रोखता येईल यासाठी कोणता मध्यममार्ग काढता येईल यासाठी सरकारने एक समिती नेमावी. प्राणीमित्र संघटनेच्या सदस्यांसह, तज्ज्ञांचा समावेश या समितीत करावा. या समितीने योग्य मार्ग काढून भटक्या कुत्र्यांना संरक्षण देऊन त्यांच्यापासून नागरिकांना होणारा उपद्रव थांबवावा.

 
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.
Powered By Sangraha 9.0