विनोदाचे अचूक टायमिंग साधणारा सर्वांचा लाडका 'लक्ष्या'

26 Oct 2024 07:33:13

Everyone favorite Laxmikant Berde
(Image Source : Instagram/ laxmikantberdeofficial)
 
 
जवळपास दोन अडीच दशके मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा लक्ष्या अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे याचा आज जन्मदिन. लक्ष्या म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीला पडलेले एक विनोदी स्वप्न. लक्ष्या या नावाशिवाय मराठी चित्रपटाचा इतिहास लिहिलाच जाऊ शकत नाही. लक्ष्मीकांत बेर्डे या त्याच्या पडद्यावरील नावापेक्षा लक्ष्या या नावानेच तो अधिक ओळखला जातो. कारण हे नाव त्याला प्रेक्षकांनी दिले आहे.
 
लक्ष्या हा मराठी प्रेक्षकांना आपल्यातीलच एक वाटायचा म्हणूनच दहा वर्षाच्या मुलापासून ऐंशी वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्वांनी लक्ष्यावर अतोनात प्रेम केले. जवळपास दोन अडीच दशके आपल्या सहज - सुंदर, विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या लक्ष्याचा जन्म सत्तर वर्षापूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे २६ ऑक्टोबर १९५४ रोजी झाला.
 
लहानपणापासून अभिनयाची आवड असलेल्या लक्ष्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात टुरटुर या नाटकाद्वारे केला. टुरटुर हे त्याचे पहिलेच नाटक कमालीचे हिट झाले आणि या नाटकातील त्याची भूमिकाही प्रेक्षकांना आवडली. त्यानंतर शांतेचं कार्ट चालू आहे, बिघडले स्वर्गाचे दार या नाटकातून त्याने केलेल्या विनोदी भूमिका प्रेक्षकांना भावल्या. ही नाटके देखील हिट झाली. लागोपाठच्या नाटकात विनोदी भूमिका करून लक्ष्या नाट्य सृष्टीत आघाडीचा विनोदी अभिनेता म्हणून पुढे येऊ लागला. याच भूमिकांच्या जोरावर त्याला मराठी चित्रपटातही संधी मिळाल्या. अर्थात नाटका प्रमाणे इथेही त्याला विनोदी भूमिकाच मिळाल्या.  त्यानेही या भूमिकांचे सोने करत त्याला मिळालेल्या विनोदी भूमिकांना न्याय दिला. त्याच्या विनोदी भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्या. त्याची लोकप्रियता वाढू लागली.
 
लक्ष्या या नावाने आबालवृद्धांमध्ये त्याची लोकप्रियता पसरली. त्याचे चित्रपट प्रचंड यशस्वी झाले. त्याची जोडी जमली ती महेश कोठारे यांच्यासोबत. महेश कोठारेंचा चित्रपट आणि लक्ष्या नाही असे सहसा घडलेच नाही. कारण महेश कोठारे आणि लक्ष्या ही जोडी म्हणजे यशाची खात्री अशी ओळखच बनली. या दोघांचा चित्रपट म्हणजे मनोरंजनाची शंभर टक्के हमी. या दोघांनी एकत्रित भूमिका केलेले धूमधडाका, धडाकेबाज, थरथराट, झपाटलेला असे कितीतरी चित्रपट तिकीटबारीवर यशस्वी झाले. यशस्वीच नाही तर या चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. लक्ष्याने सचिन पिळगावकर यांच्या सोबत केलेला अशी ही बनवा बनवी हा चित्रपट देखील हिट झाला. लक्ष्या आणि अशोक सराफ या दोघांचीही जोडी जमली. या दोघांनी एकत्रित अनेक चित्रपट केले आणि ते यशस्वीही झाले.
 
८० आणि ९० च्या दशकात लक्ष्या आणि अशोक सराफ या जोडीने मराठी चित्रपट सृष्टीत अक्षरशः धुमाकूळ घातला. ही जोडी म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील राम लक्ष्मणाची जोडी. या दोन्ही कलाकारांचे ट्युनिंग अतिशय चांगले जमले होते. या दोघानी मराठी मनांचे मनोरंजन करीत अनेकांना आयुष्यातील तणाव, दुःख विसरायला लावून आनंदाचे कारंजे फुलविले.
 
मराठीत लोकप्रियतेच्या शिखरावर असताना लक्ष्याला हिंदी चित्रपट सृष्टीतून चांगल्या ऑफर येऊ लागल्या. त्यातील काही ऑफर त्याने स्वीकारल्या. राजश्री प्रॉडक्शन्सच्या मैने प्यार किया या चित्रपटात त्याला सलमान खानच्या मित्राची भूमिका मिळाली ती त्याने छान निभावली. याशिवाय अनेक हिंदी चित्रपटात त्याने भूमिका केल्या मात्र त्याच्या अभिनयाचा कस लागेल अशा भूमिका त्याला हिंदीत मिळाल्या नाहीत त्या त्याला मिळाल्या मराठीतच. पु ल देशपांडे यांनी लिहिलेल्या एक होता विदूषक या जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात मुख्य भूमिका निभावली ती लक्ष्याने. या चित्रपटात त्याने केलेल्या गंभीर भूमिकेने त्याच्या अभिनय क्षमतेवर शिक्कामोर्तब केले. हा चित्रपट तिकीट बारिवर अपयशी ठरला तरी त्यातील त्याच्या गंभीर भूमिकेने त्याला अनेक पुरस्कार मिळवून दिले.
 
लक्ष्याने विनोदी भूमिका अधिक केल्या आणि त्या यशस्वीही झाल्या म्हणून विनोदी अभिनेता असे त्याचे वर्णन करणे हा त्याच्यावर अन्याय ठरेल. गंभीर भूमिकाही उत्तम प्रकारे करू शकतो हे लक्ष्याने एक होता विदूषक तसेच लेले विरुद्ध लेले आणि सर आले धावून या नाटकातून दाखवून दिले. आयुष्यभर प्रेक्षकांना हसवणारा हा कलाकार १६ डिसेंबर २००४ रोजी प्रेक्षकांना दुःखाच्या सागरात बुडवून काळाच्या पडद्याआड गेला. विनोदाचा अचूक टायमिंग साधणारा, अभिनयाची दैवी देणगी लाभलेल्या सर्वांच्या लाडक्या हरहुन्नरी लक्ष्याला जन्मदिनी विनम्र अभिवादन!
 
 

श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.
Powered By Sangraha 9.0