गरम भाजीच्या गंजात पडून चिमुकलीचा मृत्यू

    23-Oct-2024
Total Views |
 
Toddler dies
(Image Source : Internet/ Representative)
नागपूर:
बारशाच्या कार्यक्रमादरम्यान गरम भाजीच्या गंजात पडल्याने एका 4 वर्षीय चिमुकलीचा गंभीररित्या होरपळल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत घडली. त्रिशा बाळू पानबुडे असे मृत चिमुकलीचे नाव आहे.
 
वाठोडाच्या श्रावणनगर परिसरात पानबुडे कुटुंब वानखेडे यांच्या घरी भाड्याने राहते. गत 14 ऑक्टोबर रोजी वानखेडे यांच्या घरी बारशाचा कार्यक्रम होता. परिसरातील मुलांसोबत त्रिशाही तेथे खेळत होती. खेळता-खेळता ती अचानक गरम भाजीच्या मोठ्या गंजात पडली. रडण्याचा आवाज ऐकताच लोकांनी धाव घेतली. तिला तत्काळ गंजातून बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत ती गंभीररित्या होरपळली होती. कुटुंबीयांनी तिला उपचारार्थ खासगी रुग्णालयात नेले, मात्र प्रकृती नाजूक असल्याने मेडिकल रुग्णालयात पाठविण्यात आले. त्रिशाची प्रकृती सुरुवातीपासूनच चिंताजनक होती. सेामवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. पानबुडे कुटुंबाला या घटनेचा मोठा मानसिक आघात बसला आहे. परिसरातही सर्वत्र शोक पसरला आहे. वाठोडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.