मोबाईल, नशा, सोशल मीडियाचा वापर टाळा : डॉ. रविंद्र कुमार सिंगल

    22-Oct-2024
Total Views |
- पोलिस आयुक्तांनी मनपाच्या विद्यार्थ्यांशी साधले हितगुज

Police Commissioner Dr Ravinder Singhal met NMC students
 
 
नागपूर :
पोलिस हे नागरिकांचे, विद्यार्थ्यांचे मित्र आहेत अशी भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजवित नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईल, नशा आणि सोशल मीडियाचा वापर टाळावा असे आवाहन केले.
 
नागपूर महानगरपालिकाद्वारा संचालित हाजी अब्दुल मजीद लीडर उर्दू माध्यमिक शाळा, भानखेडा येथे स्टूडंट पोलिस कॅडेट (Student Police Cadet) अंतर्गत विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी आपल्या सहकारी अधिका-यांसोबत शाळेला भेट दिली. यावेळी नोडल अधिकारी सतीश फ़रकाटे, तहसील पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप बुवा, संजय पांडे, वाहतुक विभागाचे राऊत, स्टूडंट पोलिस कॅडेट चमूचे शांताराम ठोंबरे, राजकुमार कोडापे, शाळा निरिक्षिका सिमा खोब्रागडे, मुख्याध्यापक सुधिर कोरमकर यांच्यासह विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.
 
यावेळी पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सायबर क्राईम घडण्याची कारणे व त्याबाबतची सतर्कता, वाहतूक नियमाबाबत सतर्कता, मोबाईल वापर व त्यापासून घडणारे अपराध, गुड टच बॅड टच, नशाखोरीचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ. सिंगल यांनी विद्यार्थ्यांना पोलिस यांना न घाबरता त्यांना मित्र समजून त्याचेशी बोलावे आणि आपल्या पालकांना याबाबत माहिती द्यावी असे आवाहन केले. याशिवाय डॉ. सिंगल यांनी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात प्रगती करावी करिअर करावे यास्तव विविध दाखले देत हसत खेळत विद्यार्थ्यांशी हितगुज साधले.
 
विद्यार्थ्यांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांसोबत सेल्फ़ी, हस्तांदोलन, हितगुज साधत त्यांनी पोलिस हे आपले मित्र असतात ही भावना रुजविली व त्यांनी आपल्या वर्तनाने विद्यार्थ्यांची मने जिंकली. यावेळी एस पी सी चमूचे आगरकर यांनी सोशल मिडियाचा वापर आणि त्यात नागरिकांची होणारी फसवणूक याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचलन नौशिन सुहेल यांनी केले.