अतिक्रमण काढण्यासह स्वच्छतेला प्राधान्य द्या: आयुक्त डॉ. चौधरी यांचे निर्देश

    22-Oct-2024
Total Views |

- आयुक्तांनी केली वायुसेना नगर चौक ते सेमिनरी हिल्स परिसरातील रस्त्याच्या कामाची पाहणी
 
NMC Commissioner inspected road work

 
नागपूर :
सेमिनरी हिल्स परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमण निर्मूलन कारवाईत अतिक्रमण काढण्यासह परिसरातील स्वच्छतेला प्राधान्य द्यावे असे सक्त निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
 
नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सोमवारी स्व. दिलीप चौधरी मार्गावरील वायुसेना नगर चौक ते सेमिनरी हिल्स परिसरातील रस्त्याच्या कामाची पाहणी केली.पाहणी दरम्यान मनपाचे उपायुक्त प्रकाश वराडे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता विजय गुरुबक्षानी, झोनल स्वच्छता अधिकारी दीनदयाल टेंभेकर, यांच्यासह मॅथ्यु व मनपाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
 
पाहणी दरम्यान आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी रस्त्याच्या कडेला पसरलेल्या कचऱ्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करताना परिसरात अस्वच्छता होणार नाही याची दक्षता घ्यावी, परिसरातील स्वच्छतेला प्राधान्य देत स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत नियमित स्वच्छता ठेवावी असे सक्त निर्देश त्यांनी स्वच्छता अधिकाऱ्यांना दिले. तसेच यावेळी आयुक्त डॉ. चौधरी यांनी फुटाळा तलाव परिसर ते अंबाझरी टी-पॉईंट दरम्यान मार्गाची पाहणी केली. आयुक्तांनी यावेळी मार्गावरील अस्वच्छतेबाबत झोनल स्वच्छता अधिकारी दीनदयाल टेंभेकर यांना रस्त्याच्याकडेला असणारा कचरा त्वरित उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावावी व परिसर स्वच्छ करावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे,असे सक्त निर्देश डॉ. चौधरी यांनी दिले.