डेटिंग अ‍ॅप्समुळे तरुणाई धोक्यात; फसवणुकीचे प्रकार वाढले

22 Oct 2024 13:08:28
Dating apps have led to fraud
 (Image Source : Internet/ Representative)
एबी न्यूज नेटवर्क
हल्लीच्या सोशल मीडिया युगात मोबाईल फोन आणि त्यातील नवनवीन फीचर्स तरुणांना आकर्षित करत आहेत. यात प्रमुख आकर्षण ठरत आहेत डेटिंग अ‍ॅप्स. याच डेटिंग अ‍ॅप्समुळे तरुण मुलं-मुली आज मोठ्या संकटात सापडत आहेत. डेटिंग अ‍ॅप्सचा वापर करून फसवणुकीचे प्रमाण वाढत असून, मुलं-मुली भावनिक आणि शारीरिक पातळीवर अडकत आहेत, ज्याचा त्यांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर परिणाम होत आहे.
 
फेक प्रोफाईलद्वारे फसवणूक:
डेटिंग अ‍ॅप्सवर फेक प्रोफाईल तयार करून काही लोक तासनतास चॅट करून विश्वास संपादन करतात. त्यानंतर वैयक्तिक माहिती मिळवून पैशांची मागणी करतात. नकार दिल्यास फोटो किंवा व्हिडिओचा गैरवापर करून ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार घडतात.
 
ब्लॅकमेलिंगची वाढती समस्या:
डेटिंग अ‍ॅप्सद्वारे वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्यास, ते चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडल्यास ब्लॅकमेलिंग होण्याची शक्यता असते. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मागण्या होतात.
 
भावनिक फसवणूक आणि धोका:
काही मुलं-मुली भावनिक दृष्ट्या अडकून पडतात, तर काही वेळ निघावा म्हणून नवीन लोकांशी जोडले जातात. परंतु, अशा गप्पांमधून भावनिक फसवणूक होण्याची शक्यता असते. तसेच, प्रत्यक्ष भेटीनंतर लुटमार किंवा हिंसाचाराच्या घटनादेखील घडत आहेत.
 
सावधगिरीची गरज:
डेटिंग अ‍ॅप्सवर नवीन ओळख करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. फसवणूक आणि धोका टाळण्यासाठी वैयक्तिक माहिती शेअर करताना आणि कोणावर विश्वास ठेवताना खबरदारी घ्यावी.
 
डेटिंग ॲप ही लोकांशी जोडण्यासाठीचे एक महत्वाचे साधन आहे. एखाद्या मुलीचा किंवा मुलाचा फोटो लावायचा. त्यांना समोरच्या व्यक्तीशी चॅट करायला लावले जाते. त्यानंतर डेटिंगसाठी बोलावले जाते. काहीवेळा आर्थिक देवाणघेवाण होते. मात्र, कुणी एकांतात भेटायला बोलावत असेल तर सार्वजनिक ठिकाणी भेटण्याचा आग्रह केला पाहिजे. कित्येकदा इंटरनेटवर जे दिसते ते तसे असतेच असे नाही. डेटिंग ॲपवर चॅटिंग करताना संबधित व्यक्ती म्युच्युअल फ्रेंड लिस्टमध्ये आहे का ते पाहावे. कुणालाही मोबाईल क्रमांक, कुटुंबाचे फोटो, वैयक्तिक फोटो शेअर करू नयेत. सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Powered By Sangraha 9.0