दिल्लीतील वायुप्रदूषणामुळे श्वसनाच्या आजारात चिंताजनक वाढ

    21-Oct-2024
Total Views |
Air pollution in Delhi
 (Image Source : Internet)
नवी दिल्ली :
दिल्लीतील वायुप्रदूषणामुळे हिवाळ्यापूर्वी हवेतील गुणवत्तेची पातळी खालावत चालली आहे. दिल्लीतील हवेची गुणवत्ता नागरिकांसाठी आरोग्याच्या दृष्टीकोनाने धोकादायक बनली आहे. विशेषतः ज्यांना श्वासोच्छवासाच्या समस्या किंवा इतर गंभीर आजार आहेत, त्यांच्यासाठी तर जास्तच धोकादायक आहे.
 
हवेतील प्रदूषणाची पातळी वाढत असल्यामुळे श्वसनाच्या समस्या असलेल्या रुग्णांची संख्या 10 ते 15 टक्क्यांनी वाढली आहे. श्वासोच्छवासाचे आजार असलेल्या रुग्णांमध्ये तीव्रतेणे वाढ होत असल्यामुळे रुग्णालयात रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. प्रदूषणामुळे दमा आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिजीज यांसारख्या आजारांच्या औषधांची आवश्यकता वाढली असल्याचे वरिष्ठ सल्लागारांनी सांगितले आहे. यावर्षी नोव्हेंबरच्या आधी वायू प्रदूषणाची पातळी वाढताना दिसत आहे, ज्यामुळे श्वसनाच्या आजारांनी ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रदूषणामुळे संक्रमणाचे प्रमाणही वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीत सकाळी 10 वाजता केवळ आनंद विहारचा AQI 445 होता. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते दिल्लीच्या प्रदूषणासाठी वाहने, कारखान्यांमधून निघणारा धूर आणि धुळीचे प्रदूषण यासारखे स्थानिक घटक अजूनही अधिक जबाबदार आहेत.
 
अशातच दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी आणि पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी आनंद विहारला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी बसस्थानकावरील प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री अतिशी म्हणाल्या की, आनंद विहार हे प्रदूषणाच्या बाबतीत हॉटस्पॉट आहे. दिल्ली सरकार प्रदूषणाचा सामना करण्यासाठी सर्व उपाययोजना करत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.