केरळचे कथकली नृत्‍य ठरले प्रमुख आकर्षण

    21-Oct-2024
Total Views |

- बारा तास चालला ‘अखंड घुंगरू नाद’
- नटराज आर्ट ॲण्ड कल्चर सेंटरचा उपक्रम
 
Akhand Ghungroo Naad lasted for twelve hours
 
 
नागपूर :
सहा तासात अतिशय आकर्षक मेकअप करून केरळच्‍या कलामंडलम प्रसाद यांनी सतरा मिनिटे सादर केलेले नृत्‍य, संगीत व अभिनयाचा संगम असलेले कथकली नृत्‍य ‘अखंड घुंगरू नाद’ या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
 
धरमपेठ शिक्षण संस्था द्वारा संचालित नटराज आर्ट ॲण्ड कल्चर सेंटरद्वारे रविवारी ‘अखंड घुंगरू नाद 2024’ हा शास्त्रीय नृत्यांवर आधारित उपक्रम आयोजित करण्‍यात आला. देशभरातील कथकली, भरतनाट्यम, कथक, ओडिसी, मणिपुरी, मोहिनीअट्टम, कुचिपुडी,सत्‍तरिया हे आठही शास्‍त्रीय नृत्‍य प्रकाराच्‍या सुमारे 200 शास्‍त्रीय कलाकारांनी सलग 12 तास नृत्‍य सादर करून नागपूरकरांना अनोखी मजेवानी दिली.
 
धरमपेठ येथील नटराज आर्ट ॲण्ड कल्चर सेंटरमध्‍ये सकाळी नटराज पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपाद अपराजित, मुंडले एज्युकेशनल ट्रस्टचे विश्वस्त निखिल मुंडले व मुंडले, पुण्याच्या औटी ग्रुपचे प्रमोद तिजारे, अभिनेते दिग्‍दर्शक रविंद्र दुरुगकर, धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उल्हास औरंगाबादकर, उपाध्‍यक्ष रत्‍नाकर केकतपुरे, सदस्‍य सुरेश देव, विनय सालोडकर, नटराज आर्ट कल्चर सेंटरचे संयोजक अ‍ॅड. संजीव देशपांडे, प्राचार्य डॉ. रविंद्र हरिदास यांच्‍या प्रमुख उपस्‍थ‍ितीत झाले.
 
त्‍यानंतर संयोजिका अवंती काटे व पूजा हिरवडे यांनी अत्‍यंत आकर्षक ईशस्‍तवन सादर करून या नृत्‍य शृंखलेला प्रारंभ केला. नागपूरसह, महाराष्‍ट्राच्‍या इतर भागातून तसेच, केरळ, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी राज्‍यातून आलेल्‍या कलाकारांनी नटराजाला आपली सेवा अर्पण केली.
 
सकाळी आठ वाजता सुरू झालेल्‍या या उपक्रमाचा रात्री 8 वाजता कविकुलगुरू कालिदास विद्यापीठाचे उपकुलसचिव प्रा. जयवंत चौधरी यांच्‍या उपस्‍थ‍ितीत समारोप झाला. आठही शास्‍त्रीय नृत्‍य प्रकाराच्‍या कलाकारांनी थीम सॉंग वर नृत्‍य सादर करून शानदार पद्धतीने या उपक्रमाचा समारोप केला. या उपक्रमाला नागपुरात नृत्‍य गुरूंनी उपस्‍थ‍िती लावली व आयोजकांचे कौतुक केले. ‘अखंड घुंगरू नाद’ या कार्यक्रमाचे हे यंदाचे तिसरे वर्ष होते. उपक्रमाला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत असून यावेळी पहिल्‍यांदाच देशभरातील कलाकार या उपक्रमात सहभागी झाले आहेत.