जगात भारी यांची यारी! 'पिंगा गं पोरी पिंगा' लवकरच आपल्या'कलर्स मराठी'वर

02 Oct 2024 17:15:25

Pinga Ga Pori Pinga soon to release on Colors Marathi
 (Image Source : Agency)
 
मुंबई :
महाराष्ट्राच्या लाडक्या 'कलर्स मराठी' वाहिनीवर सध्या अनेक नव्या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. 'आई तुळजाभवनी','अशोक मामा','बाईपण भारी रं' या मालिकांनंतर 'कलर्स मराठी'वर लवकरच 'पिंगा गं पोरी पिंगा' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच या मालिकेची पहिली झलक समोर आली आहे.
 
'पिंगा गं पोरी पिंगा' या भन्नाट मालिकेच्या माध्यमातून 'कलर्स मराठी'ने प्रेक्षकांना नवं सरप्राईज दिलं आहे. एक युनिक स्टोरी प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. समोर आलेली मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मुंबईतील एका आलिशान सोसायटीत चार मुली आधीपासून पेइंग गेस्ट म्हणून राहत आहेत. आता त्यांच्यात भर पडते पाचव्या मुलीची. आधीपासून राहणाऱ्या पेइंग गेस्ट मुलींबद्दल सोसायटीतील काकूंना फारसं पटत नाही. त्यामुळे घरात शिरणाऱ्या नव्या मेंबरलाही त्या जर्ज करतात. पण बाकीच्या मुली मात्र या नव्या मेंबरला लगेचच आपलंसं करत एक आत्मविश्वास देतात आणि लोकांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्लाही देतात.
 
वेगवेगळ्या शहरांतून मायानगरी मुंबईत आलेल्या आणि एका बड्या सोसायटीत पेइंग गेस्ट म्हणून राहत असलेल्या पाच मुलींभोवती फिरणारं या मालिकेचं कथानक आहे. या पाचजणी काय धमाल करणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 'कलर्स मराठी'वरील 'रमा राघव' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री ऐश्वर्या शेट्ये पुन्हा एकदा या मालिकेच्या माध्यमातून छोटा पडदा गाजवायला सज्ज आहे. ऐश्वर्यासह विदिशा म्हसकर, शाश्वती पिंपळीकर, प्राजक्ता परब आणि आकांक्षा गाडे या अभिनेत्री या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
 
आजवर पुरुषांच्या मैत्रीवर आधारित अनेक चित्रपट, मालिका, नाटक, वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. पण महिलांच्या मैत्रींवर भाष्य करणाऱ्या कलाकृती खूप कमी आहेत. वर्षभरापूर्वी रिलीज झालेल्या 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाने महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीच्या हृदयात विशेष जागा निर्माण केली. या चित्रपटानंतर 'कलर्स मराठी'ने 'बाईपण भारी रं' या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम महिलावर्गाला एक खास सरप्राईज दिलं. या मालिकेच्या पाठोपाठ 'पिंगा गं पोरी पिंगा' ही नवी मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. 'कलर्स मराठी'वर सध्या नवनवे प्रयोग होत आहे. 'पिंगा गं पोरी पिंगा' ही मालिकादेखील याचाच एक भाग आहे. विभिन्न स्त्रियांच्या मैत्रीवर आधारित ही मालिका आहे. 'पिंगा गं पोरी पिंगा' मधील या पाच जणींच्या मैत्रीची रंगत न्यारी आहे... कारण त्यांची यारी जगात भारी आहे.
Powered By Sangraha 9.0