तरुणांसाठी छत्तीसगड सरकारकडून मोठी घोषणा; नोंदणीसह मिळणार निधीची मदत

    19-Oct-2024
Total Views |
Big Announcement from Chhattisgarh Govt for Youth
 (Image Source : Internet)
छत्तीसगड :
छत्तीसगड सरकारकडून राज्यातील तरुणांना मोठी संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी याची घोषणा केली आहे. राज्यातील तरुणांच्या नवकल्पना विकसित करण्यासाठी सरकारने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. जर तरुणांकडे कोणतीही नवीन कल्पना असेल, तर त्याला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून निधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन नोव्हेंबर महिन्यात रायपूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात होणार आहे.
 
उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी याबाबत माहिती दिली आहे. छत्तीसगड सरकारने गुजरातसोबत सामंजस्य करार केला असून आय-हब छत्तीसगडची निर्मिती आय-हब गुजरातमध्ये केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आय-हब छत्तीसगड हे व्यासपीठ तरुणांना त्यांच्या कल्पना मांडण्याची संधी देईल. या हबमध्ये नोंदणी केल्यानंतर कोणताही व्यक्ती आपली कल्पना सरकारसमोर मांडू शकतो. या उपक्रमासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही, त्यामुळे कोणत्याही वयातील व्यक्ती या संधीचा फायदा घेऊ शकते. जर एखादी कल्पना प्रभावी वाटली तर संबंधित व्यक्तीला तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ती कल्पना विकसित करण्याची संधी दिली जाईल. याशिवाय, औद्योगिक मदत आणि स्टार्टअप सुरू करण्यासाठी निधीदेखील उपलब्ध करून दिला जाईल, असेही उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.