विधानसभा निवडणूक 2024: मोर्शी मतदारसंघात रंगणार राष्ट्रवादी विरुध्द राष्ट्रवादीचा खेळ

    19-Oct-2024
Total Views |

Assembly Elections 
मोर्शी:
महाराष्ट्राची 14 व्या विधानसभा निवडणुकीची (Assembly Elections) आचारसंहिता घोषीत झाल्यानंतर हळूहळू राजकीय रंग चढायला लागला आहे. प्रशासनासह व राजकीय पुढारीही तयारीला लागले आहे. शेतकरी संघटनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठींब्यावर आमदार झालेले देवेंद्र भूयार फुटीर गट अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लढण्याचा तयारीत आहे. तर शरद पवार येथील जागा आपल्या राष्ट्रवादी करिता आरक्षीत ठेवत असल्याने येथे आगामी काळात महायुतीतील राष्ट्रवादी विरुध्द महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचा खेळ पहायला मिळणार आहे.
 
मोर्शी मतदारसंघातून महायुती व महाविकास आघाडी ने आपले उमेदवार जवळपास निश्चित केल्यासारखे आहे. त्यामध्ये महायुतीने मोर्शी विधानसभा मतदारसंघ आपल्या घटक पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या करिता सोडला आहे, तर महाविकास आघाडीने आपला घटक पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याकरिता सोडला आहे. तसेच बहुजन वंचित आघाडीची तिकीट प्राचार्य रमेश ढोरे यांना पक्की झाल्याचे माहिती आहे. ते सुद्धा आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. वरुड मध्ये मोठा महिला मेळावा घेऊन अजित पवार यांनी विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांचे नाव जवळजवळ निश्चित केले. तरीही राज्यसभेचे खासदार आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष अनिल बोंडे भाजपाच्या अर्चना मुरूमकर यांना मोर्शी मतदारसंघात पुढे करीत आहेत. भाजपाचे मतदार संघात प्रभारी अमित कुबडे हे सुद्धा मी रिंगणात असेलच असे सांगत आहे. त्यामुळे महायुती मध्ये बंडखोरी होणार हे निश्चित आहे. महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी पक्ष (शरद पवार गट) चे तिकीट मिळविण्याकरता अनेक इच्छुक उमेदवारांनी आपापले पक्ष सोडून तिकीट मिळविण्याकरता प्रयत्न करित आहे. त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादीचेच निष्ठावंत मोहन मडघे, डॉ.प्रदीप कुऱ्हाडे, काँग्रेसचे गिरीश कराळे, काँग्रेसचेच विक्रम ठाकरे, भाजपाचे डॉ.मनोहर आंडे, उमेश यावलकर इत्यादींचा समावेश आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मोर्शीचे तिकीट विक्रम ठाकरे यांना देण्यात यावे अशी पक्षातील काही ज्येष्ठ नेते पक्षाचे राष्ट्राध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि खासदार अमर काळे यांना मागणी करित आहे. तर यापुढे पक्षाच्या भवितव्यासाठी जातीय समीकरण पाहून तिकीट डॉ.मनोहर आंडे यांना दिले जावे असे या जिल्ह्यातील पक्षाचे वरिष्ठ नेते व माजीमंत्री हर्षवर्धन देशमुख यांना वाटते. परंतु पक्षाने कुणालाही तिकीट दिले तरी आम्ही त्याचे प्रामाणिकपणे काम करू असे हर्षवर्धन देशमुख यांचे म्हणणे आहे.
 
13 निवडणुकांमध्ये सात वेळा काँग्रेसचा विजय
1962 पासून झालेल्या 13 निवडणुकांमध्ये आतापर्यंत 7 वेळा काँग्रेसचा विजय झाला आहे, तर तीन वेळा अपक्षांनी बाजी मारली आहे. 2004 मध्ये जनस्वराज संस्था, 2014 मध्ये भारतीय जनता पक्ष आणि 2019 मध्ये शेतकरी स्वाभिमानी पक्ष यांनी विजय मिळवला आहे. या मतदारसंघात हर्षवर्धन देशमुख यांनी 1990 मध्ये, 1995 मध्ये आणि 2004 मध्ये असे तीन वेळा प्रतिनिधित्व केलेले आहे. तर डॉ अनिल बोंडे यांनी 2009 आणि 2014 मध्ये प्रतिनिधित्व केलेले आहे. 13 पैकी सात वेळ हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात राहीला आहे.
 
भाजपचा एक गट बंडखोरी करण्याचा तयारीत
निवडणुकीमध्ये महायुतीचे देवेंद्र भुयार तर महाविकास आघाडीचे विक्रम ठाकरे किंवा डॉ. मनोहर आंडे, भाजपाच्या बंडखोर म्हणून सौ अर्चना मुरूमकर, अमित कुबडे, श्रीधर सोलव, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे मोर्शी नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष मोहन मडघे सुद्धा हर्षवर्धन देशमुख यांना तिकीट मिळाले नाही तर उभे राहण्याची शक्यता आहे. प्रहार चे डॉ.महेंद्र राऊत हे सुद्धा आपला जनसंपर्क दौरा करीत आहेत. वाढत्या वयामुळे मी लोकसभा किंवा विधानसभा कोणतीही निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे हर्षवर्धन देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे निवडणूक अटीतटीची होणार आहे. हे तेवढेच खरे.