इन्स्टंट नूडल्स खाण्याचा शॉर्टकट की रुग्णालयात जाण्याचा लॉंगकट? जाणून घ्या दुष्परिणाम

    18-Oct-2024
Total Views |
Shortcut to eating 2 minute noodles or long cut to the hospital (Image Source : Internet/ Representative)

एबी न्यूज नेटवर्क :
आताचे दैनंदिन जीवन आणि दिनचर्येतील कामांचा वेग हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. प्रत्येकजण घाईत असल्यामुळे सहज मिळणाऱ्या गोष्टींकडे अधिक आकर्षित होत आहे. पण यामुळे सर्वाधिक परिणाम होतो तो खाण्या-पिण्याच्या गोष्टींवर. अधिक वेळ न घालवता झटपट काय बनू शकत याच्याच प्रयत्नात नोकरी करणाऱ्या बहुतांश लोकांचा कल असतो. त्यातच छोटी भूक भागवण्यासाठी इन्स्टंट नूडल्सपासून बऱ्याच गोष्टी बाजारात सहज उपलब्ध असतात.
 
आजकाल बाजारात मिळणारे बरेच खाद्यपदार्थ कमी वेळात, कमी मेहनतीत तयार होतात. पण याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण छोटी भूक भागवण्यासाठी २ मिनिटात तयार होणारे इन्स्टंट मॅगी, नूडल्स खातात. एक कप गरम पाणी वापरून तुम्ही कधीही आणि कुठेही हे इन्स्टंट नूडल्स बनवू शकता. हा सगळ्यात सोपा आणि सोयीचा पर्याय असला तरी जास्त प्रमाणात याचे सेवन केल्यास दुष्परिणामही उद्भवू शकतात. त्यामुळे त्याबद्दलही एकदा जाणून घेणे आवश्यक आहे.
 
 
 
मॅगीमध्ये 46 टक्के सोडियम असते. सोडियम हा एक असा पदार्थ आहे जो तुम्हाला गंभीर आणि जीवघेण्या आजारांना बळी पडू शकतो. मॅगीमधील सोडियम तुमच्या रक्तदाबावर परिणाम करू शकतो. याशिवाय, यामध्ये फायबर कमी असल्यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत अनेकजण मॅगी आवडीने खातात, पण त्यातून शरीराला पोषक घटक मिळत नाहीत. मॅगीमध्ये असलेले प्रिझर्व्हेटिव्ह्स आणि कृत्रिम फ्लेवर्स दीर्घकालीन आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात. मॅगीसारखे जंक फूड नियमित खाल्ले तर शरीराला आवश्यक पोषक घटक मिळत नाहीत, ज्यामुळे पोषणाची कमतरता निर्माण होऊ शकते. मॅगीमध्ये ट्रान्स फॅट्स असतात, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवू शकतात, त्यामुळे हृदयाला योग्यरित्या कार्य करण्यास समस्या निर्माण होतात. तज्ज्ञांच्या मते, ट्रान्स फॅट्सच्या अतिसेवनामुळे मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा, आणि पोषणाची कमतरता यांसारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
 
मॅगी हे सकाळच्या थंडीत दिलासा देणारे किंवा ट्रेकिंगदरम्यान भूक भागवणारे झटपट बनणारे खाद्यपदार्थ असू शकते, पण रोज मॅगी खाणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. आवडत्या मॅगीचे किंवा नूडल्सचे दररोज सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जरी हे अन्न झटपट तयार होत असले आणि सोयीस्कर असले, तरीही त्याचे गंभीर दुष्परिणाम आहेत. प्रत्येक गोष्ट चवदार असल्याने ती आरोग्यासाठी पोषक असेलच असे नाही. म्हणून मॅगीसारखे पदार्थ मर्यादित प्रमाणात खाणेच आरोग्यासाठी चांगले आहे.