Blog : भारत न्यूझीलंडलाही क्लीन स्वीप देणार?

    17-Oct-2024
Total Views |

India and New Zealand Test match
 (Image Source : Internet/ Representative)
 
 
बांगलादेशला कसोटी आणि टी २० मालिकेत क्लीन स्वीप दिल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता न्यूझीलंडशी दोन हात करण्यास सज्ज झाला आहे. न्युझीलंड संघ भारत दौऱ्यावर आला असून या दौऱ्यात भारत - न्युझीलंड यांच्यात तीन कसोटी सामन्याची मालिका खेळणार होणार असून या मालिकेतील पहिला कसोटी सामना कालपासून म्हणजे १६ तारखेपासून सुरू झाला आहे.
 
भारतासाठी ही खूप महत्वाची मालिका आहे, कारण या मालिकेत विजयी मिळवून भारत विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील आपले स्थान नक्की करणार आहे. या मालिकेत जर भारताने विजय मिळवला, तर सलग तीन वर्ष विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवणारा भारत हा पहिला संघ ठरेल. अर्थात भारत ही कसोटी मालिका जिंकणार यात कोणालाही शंका नाही. प्रश्न आहे तो फक्त भारत-न्यूझीलंडला बांगलादेश प्रमाणेच क्लीन स्वीप देणार का? इतकाच. अर्थात भारताचा सध्याचा फॉर्म पाहता भारत या मालिकेत न्यूझीलंडला क्लीन स्वीप देत ३ - ० ने नमवेल अशीच चिन्ह दिसत आहे.
 
भारत आज विश्व चॅम्पियनशिपच्या पदक तालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय संघ सध्या तुफान फॉर्मात आहे. भारताचे सर्वच फलंदाज आणि गोलंदाज आज फॉर्मात आहे. भारताची फलंदाजी तर जगातील अव्वल फलंदाजी असून जगातील सर्वात धोकेदायक फलंदाज भारतात आहे. भारताचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा तसेच माजी कर्णधार विराट कोहली हे जगातील सर्वोत्तम फलंदाज समजले जातात. यासोबतच भारताकडे यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल हे युवा फलंदाज असून ते त्यांच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. अतिशय कमी कालावधीत या दोन्ही धडाकेबाज फलंदाजांनी अनेक विक्रम करत खोऱ्याने धावा केल्या आहेत.
 
विकेट किपर ऋषभ पंत हा देखील असाच एक धडाकेबाज फलंदाज भारताकडे आहे. जीवघेण्या अपघातातून सावरलेला ऋषभ पंत हा जगातील सर्वात आक्रमक फलंदाज मानला जातो. आपल्या आक्रमक खेळीने सामना भारताकडे वळवण्याची ताकद त्याच्याकडे आहे. के एल राहुल हा संयमी फलंदाज मधल्या फळीचा कणा आहे. आक्रमक आणि संयमी अशा दोन्ही प्रकारच्या खेळी तो करू शकतो. त्यामुळेच ही जगातील सर्वोत्तम फलंदाजांची फळी म्हणून भारताच्या फलंदाजीकडे पाहिले जाते.
 
रविचंद्रन आश्विन आणि रवींद्र जडेजा हे भारताचे सर्वोत्तम फिरकीपटू आता केवळ फिरकीपटू नसून ते आता अष्टपैलू बनले आहेत. हे दोघे केवळ बॉलनेच नव्हे तर बॅटनेही कमाल करू शकतात हे आपण बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत पाहिले आहे. त्यांच्या गोलंदाजीवर तर न बोललेलेच बरे. कसोटी मधील सर्वोत्तम फिरकी जोडी अशी त्यांची ओळख असून दोघानी मिळून ८५० च्या वर बळी घेतले आहेत. जसप्रीत बुमरा हा जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज भारताकडे आहे. हा गोलंदाज भल्या भल्या फलंदाजांची दांडी गुल करण्यात माहीर आहे. त्याला मोहंमद सिराज आणि नवोदित आकाश दीप यांची साथ मिळते, त्यामुळे भारताचा हा संघ जगातील सर्वोत्तम संघ मानला जात आहे.
 
अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यासारखे गोलंदाज पॅव्हेलियनमध्ये बसतात, यावरून भारतीय संघात किती ताकद दिसून येते. एकीकडे भारतीय संघ भक्कम दिसत असताना न्युझीलंड संघाने मात्र त्यांचा फॉर्म गमावला आहे. श्रीलंकेने त्यांचा नुकताच पराभव केला आहे. गेल्या काही दिवसात या संघाने उल्लेखनीय असा खेळ केलेला नाही. भारतातही या संघाची कामगिरी निराशाजनक आहे. भारतात विजय मिळवून या संघाला कैक वर्ष उलटली आहेत. मागील अनेक वर्षात हा संघ भारतात विजय मिळवू शकला नाही त्यामुळे भारतीय संघ न्यूझीलंडला देखील ३ - ० असा क्लीन स्वीप देऊन विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश निश्चित करेल यात शंका नाही.
 
भारतीय संघ घरच्या मैदानावर दादा संघ आहे . घरच्या मैदानावर मागील १८ मालिका भारताने जिंकल्या आहेत यावरून भारताच्या ताकदीची कल्पना आहे. न्युझीलंड विरुद्ध विजय मिळवून भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडलाही इशारा देऊ शकतो कारण या मालिकेनंतर भारताला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तुल्यबळ प्रतिस्पर्धी संघाशी लढायचे आहे शिवाय विश्व कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीतही विजय मिळवायचा आहे त्याची पायाभरणी भारत या मालिकेतून करेल यात शंका नाही. भारतीय संघाला मनापासून शुभेच्छा!
 
 
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.