अन्नाची नासाडी : सामाजिक गुन्हा

16 Oct 2024 07:51:44

Food Wastage is a Social Crime
 (Image Source : Internet/ Representative)
 
 
१६ ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण जगात जागतिक अन्न दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरात विविध दिन उत्साहात साजरे केले जातात. त्यापैकी अन्न दिन महत्वाचा मानावा लागेल, कारण त्याचा थेट मानवी जीवनाच्या आस्तित्वाशी संबंध आहे. अन्न सुरक्षेबाबतची एकंदर परिस्थिती पाहता अन्न दिनाबाबत जागरूकता वाढीस लागण्याची गरज आहे. परंतु आजही आपण अन्न सुरक्षेबाबत आणि अन्नाच्या नासाडी बाबत गंभीर नाहीत, असेच म्हणावे लागेल.
 
अन्न हे पूर्णब्रह्म आहे. अशी आपली संस्कृती सांगते पण ही संस्कृती आपण विसरत चाललो आहे की काय असा प्रश्न पडावा असा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रम आणि भागीदार संस्था डब्ल्यूआरएपीचा अहवालानुसार, आपल्या देशात दरवर्षी ६८ दशलक्ष टन धान्याची नासाडी केली जाते. यातील ६१ टक्के अन्न घरातून, २६ टक्के अन्न सेवांमधून तर १३ टक्के अन्न किरकोळ क्षेत्रात वाया जाते. भारतासारख्या कृषिप्रधान देशात इतक्या मोठ्या प्रमाणात अन्न वाया जाणे ही भूषणावह बाब नाही. भारतासारख्या विकसनशील देशात जिथे दररोज साठ टक्के लोक उपाशी किंवा अर्धपोटी झोपतात, तिथे अन्नाची अशी नासाडी परवडणारी नाही. वाया जाणारे हे अन्न जर गोरगरिबांच्या, भुकेल्यांच्या मुखात पडले, तर देशात कोणीही उपाशी झोपणार नाही. पण आपल्याला आपल्या संस्कृतीचा विसर पडत चालला आहे. आपल्याला हवे तेवढेच अन्न पानात काढून घ्यायचे आणि तेवढेच खायचे अशी, आपली परंपरा आहे. खाऊन माजावे पण फेकून माजू नये अशी आपली आजी सांगायची हेही आपण विसरून गेलो आहोत.
 
पाश्चात्य देशात हॉटेलातही पानातले अन्न टाकणे हा सामाजिक गुन्हा मानला जातो. भुकेने व्याकुळ झालेल्या लोकांची आठवणही अन्न टाकून देणाऱ्या या सोकावलेल्या श्रीमंतांना येत नाही. अन्नाची नासाडी हा सामाजिक गुन्हा आहे, याचे भान अन्न टाकून देणाऱ्या श्रीमंतांना राहिले नाही. पोटातील भुकेची आग भागवण्यासाठी देशातील कोट्यवधी लोक भीक मागतात. आदिवासी, दुर्गम भागात आजही लाखो लोक पुरेसे अन्न मिळत नाही, म्हणून कुपोषित आहेत. तर दुसरीकडे दररोज लाखो टन अन्न फेकून दिले जाते, ही विसंगती बदलायला हवी.
 
वाया जाणारे हे अन्न गोरगरिबांच्या मुखात पडेल अशी व्यवस्था असायला हवी. हैदराबाद, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, मुंबई, बंगळुरु यासारख्या मोठ्या शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, घरात उरलेले अन्न गरिबांना मिळावे यासाठी कम्युनिटी किचन ही संकल्पना अमलात आणली गेली. या संकल्पनेनुसार शहरातल्या विविध भागातल्या रस्त्यावरच्या कम्युनिटी किचन च्या केंद्रातल्या मोठ्या फ्रीजमध्ये उरलेले अन्न ठेवले जाते. भुलेल्यांनी ते काढून घ्यावे अशी सुविधा या केंद्रात आहे पण ही संकल्पना शहरातील मोठ्या शहरातच आहे, ती ही व्यापक नाही. कम्युनिटी किचन सारखी संकल्पना प्रत्येक शहरात व्यापक स्वरूपात राबवायला हवी म्हणजे वाया जाणारे अन्न भुलेल्यांच्या मुखात जाईल आणि अन्नाची नासाडीही थांबेल.
 
 
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 
 

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.
Powered By Sangraha 9.0