लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड

    15-Oct-2024
Total Views |
Atul Parchure
 (Image Source : Internet)
मुंबई :
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय आणि अनुभवी अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाले. काही महिन्यांपूर्वी ते कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर त्यांची ही झुंज संपली असून सोमवारी सायंकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. २०२३ मध्ये त्यांच्या यकृतात ५ सेमी लांबीची गाठ आढळली होती, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. कर्करोगाचे निदान स्वीकारणे त्यांच्यासाठी अत्यंत कठीण असल्याचेही त्यांनी म्हटले होते. अतुल परचुरे यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन जगताला मोठा धक्का बसला आहे.
 
काही महिन्यांपूर्वी अतुल परचुरे यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. त्यातून ते बरे पण झाले होते, पण आता त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांनी अनेक नाटके, चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
 
अतुल परचुरे यांनी सांगितले होते की, कर्करोगाच्या निदानानंतर योग्य उपचार न मिळाल्याने त्यांची तब्येत खालावत गेली. त्यांना चालणे आणि बोलणेही अवघड झाले होते, ज्यामुळे त्यांच्या कामावर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम झाला. मराठी चित्रपट आणि रंगभूमीवर लोकप्रिय असलेल्या अतुल परचुरे यांनी बॉलिवूडमध्येही आपली छाप सोडली होती. 'बिल्लू', 'पार्टनर', 'ऑल द बेस्ट' यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.
 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतुल परचुरे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना एक गतिमान अभिनय मास्टर म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या महान अभिनय कौशल्याची स्तुती केली. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीने एक महान अभिनेता गमावला आहे, ज्याची भरपाई होणे कठीण आहे असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी परचुरे यांच्या कुटुंबीयांसोबत दु:ख व्यक्त केले आणि राज्य सरकारच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. अतुल परचुरे यांना नुकतेच मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. शतकातील महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार मिळाला होता.