कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर गंभीर आरोप

    15-Oct-2024
Total Views |

PM Justin Trudeau made serious allegations against India(Image Source : Internet) 
 
एबी न्यूज नेटवर्क :
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामधील राजनैतिक तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. यात आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा भारतावर गंभीर आरोप केले आहेत.
 
पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी पत्रकार परिषदेत भारतावर आरोप करीत म्हटले की, 'भारतीय सरकारचे एजंट कॅनडाच्या भूमीवर कॅनडाच्या नागरिकांविरुद्ध गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील आहेत. या प्रकरणाच्या तपासात भारताने कॅनडाला सहकार्य केले नाही, आम्ही कोणत्याही कॅनडाच्या नागरिकाला धमकावणे किंवा मारणे हे खपवून घेणार नाही. हे कॅनडाच्या सार्वभौमत्वाचे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे.'
 
पंतप्रधान जस्टिन ट्रूडो पुढे म्हणाले की, 'कॅनडा हा कायद्याचे पालन करणारा देश आहे, आमच्या नागरिकांची सुरक्षा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कॅनडाच्या भूमीवर कॅनडाचे नागरिक हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येत भारत सरकारचे एजंट थेट सहभागी होते. यावर आम्ही तातडीने कारवाई केली.' मी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो. पण गेल्या वर्षी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये माझे विधान झाल्यापासून या संपूर्ण प्रकरणावर भारत सरकारची प्रतिक्रिया नाकारणे अशीच आहे. माझ्यावर वैयक्तिक हल्लेही झाले आहेत. इतकेच नाही तर कॅनडाचे सरकार, अधिकारी आणि आमच्या एजन्सींवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
 
गत वर्षी जून महिन्यात झाली होती निज्जरची हत्या
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरला भारताने दहशतवादी घोषित केले होते. 18 जून 2023 रोजी ब्रिटिश कोलंबियातील गुरुद्वाराबाहेर त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर सप्टेंबरमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टूडो यांनी निज्जरच्या हत्येत भारतीय दलालांचा हात असल्याचा आरोप केला होता. भारताने टूडो यांचे आरोप फेटाळून लावले. पण येथूनच भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडू लागले.