(Image Source : Internet/ Representative)
एबी न्यूज नेटवर्क :
आयपीएलच्या शेवटच्या हंगामात इम्पॅक्ट प्लेयर अनेक वादांचा विषय ठरला होता. अनेक बड्या खेळाडूंनी या नियमाविरोधात विधाने केली. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या नियमाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने देशांतर्गत स्पर्धांमधून इम्पॅक्ट प्लेयर हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधून इम्पैक्ट प्लेयर हटवला आहे. ट्रॉफी 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून 15 डिसेंबरपर्यंत खेळवली जाणार आहे. बीसीसीआयने राज्य संघटनांना संदेशाद्वारे इम्पॅक्ट प्लेयरवरील निर्णयाची पुष्टी केली आहे.
असा होता इम्पॅक्ट प्लेअर नियम
इम्पॅक्ट प्लेयर नियम पहिल्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये वापरला गेला. त्यानंतर त्याची अंमलबजावणी आयपीएल-2023 मध्ये सुरू झाली. इम्पॅक्ट प्लेयर नियमानुसार , नाणेफेकीनंतर दोन्ही कर्णधारांना पाच पर्यायी खेळाडूंची नावे द्यावी लागतात. कर्णधाराने निवडलेल्या चार खेळाडूंपैकी एक इम्पॅक्ट खेळाडू म्हणून निवडला जातो आणि तो खेळाडू कधीही फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी वापरला जाऊ शकतो. हा 12वा खेळाडू मैदानात उतरताच सामन्याचा निकाल बदलू शकतो. त्याच्या आगमनानंतर अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्व कमी होते. कारण संघ फलंदाजीच्या वेळी अतिरिक्त फलंदाज खेळतो आणि गोलंदाजीच्या वेळी त्याच्या जागी नवीन गोलंदाज घेतो.