मंत्रोच्चाराच्या मंगलध्वनीत गोविंददेव गिरि महाराजांना जिजामाता विद्वत पुरस्कार प्रदान

    14-Oct-2024
Total Views |
 
Govinddev Giri Maharaj Awarded with Jijamata Scholar Award
 
 
नागपूर :
छत्रपती सेवा प्रतिष्ठान, नागपूर-पुणेतर्फे दिला जाणारा ‘जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार यावर्षी राष्ट्रयोगी तपस्वी संत गोविंददेव गिरि महाराजांना प्रदान करण्यात आला.
 
व्यासपीठावर सत्कारमूर्ती राष्ट्रयोगी स्वामी गोविंददेव गिरि महाराज, ज्ञानेशनंदिनी प्रतिष्ठान पाथर्डीचे अध्यक्ष प्रज्ञाचक्षू विद्याभूषण मुकुंदकाका जाटदेवळेकर, विशेष अतिथी धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज, छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजेय देशमुख, स्वामी गोविंद महाराज जाटदेवळेकर यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यानंतर शिवस्तुती प्रस्तुत करण्यात आली. यानंतर मान्यवरांचे शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी एका चित्रफितीद्वारे गोविंददेव गिरि महाराजांच्या कार्याची ओळख करून देण्यात आली.
 
यावेळी गोविंददेवगिरि महाराज यांना प्रज्ञाचक्षू विद्याभूषण मुकुंदकाका जाटदेवळेकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ, 51 हजार रोख आणि जिजामाता विद्वत गोैरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मंत्रोपचारात सर्व मान्यवरांवर पुष्पार्पण करण्यात आले. गोविंद महाराज जाटदेवळेकर यांनी यावेळी मानपत्राचे वाचन केले. त्यानंतर ते गोविंददेव गिरि महाराजांना अर्पण करण्यात आले.
 
सत्काराला उत्तर देताना गोविंददेव गिरि महाराजांना
म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हा केवळ व्याख्यानाचा विषय असू नये. हा विषय धर्माच्या व्यासपीठावर पोहोचायला हवा, याचा मी ध्यास घेतला आहे. पहिली शिवकथा धार्मिक पीठावरून पतंजली योगपीठावर सादर केली. छत्रपतींमध्ये चैतन्य तत्वाचा वेगळा आविष्कार होता. छत्रपतींनी जे केले ते अचाट आहे, अद्वितीय आहे. आपल्या शिक्षण यंत्रणेतून राष्ट्रभक्तांना डावलले. आपल्या हिंदू सम्राटांचा इतिहास शिकविला जात नाही. छत्रपतींची चेतना सर्वांच्या मनामध्ये जागृत करणे आवश्यक आहे.
 
रामायण, महाभारतातील सर्व सद्गुण एकत्र केले तर छत्रपती शिवाजींची मूर्ती तयार होईल. जे अस्सल चरित्र लोकांसमोर येणं आवश्यक आहे. मला त्यांच्यामध्ये वेद, रामायण, महाभारत, भविष्याच्या युक्ती सर्व काही आहे. राष्ट्राचा दीपस्तंभ केवळ शिवाजी महाराज आहे. असे ते दिव्य चरित्र आहे. मला मिळालेला पुरस्कार हा जिजामाताचा प्रसाद आहे. त्या विश्ववंदनीय आहेत. आपल्याला आपल्या मुळापर्यंत जायचे असेल तर संस्कृत भाषेशिवाय तरणोपाय नाही. गुडगव्हर्नन्स काय असतं शिवचरित्रातून कळतं. हिंदू राष्ट्र आणि हिंदू साम्राज्य यातील फरक कळायला हवा. शिवाजी महाराजांना होणारी प्रेरणा जिजामातेकडून मिळाली होती. सद्गुरुदास महाराजांनी शिवाजी महाराजांचे चरित्र जे चरित्र लिहिले ते सर्वांना मार्गदर्शक ठरेल. शिवाजी महाराज राजांमधील संत होते, तर ज्ञानेश्वर महाराज संतांमधील राजे होते. छत्रपतींनी दिलेल्या आज्ञा मोडण्याचे सामर्थ्य फक्त जिजामातांमध्ये होते. सद्गुरुदास महाराजांनी माझा या पुरस्कारासाठी विचार केला, हे माझ्याकरिता अभिमानास्पद असे ते आशीर्वचनात म्हणाले.
 
यावेळी मुकुंदकाका जाटदेवळेकर महाराज म्हणाले, आत्ता आपल्यापुढे आव्हान आहे. आपण छत्रपतींची प्रेरणा घेतली की नाही हे आपल्या वागण्यावरून कळणार आहे. ज्याच्या आज्ञेला जगाने नमस्कार करावा, असे जे त्यांचे गुण आहेत ते सर्वांनी आत्मसात करावे. या पुरस्काराकरिता एका नररत्नाला निवडलं, असं मी मानतो. अशा प्रकारच्या रत्नाची निवड केल्याबद्दल सद्गुरुदास महाराजांचे अभिनंदन त्यांनी केले.
 
प्रास्ताविकात अजय देशमुख यांनी, शिवप्रतिष्ठानचे आजचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. संस्थेचे संस्थापक सद्गुरूदास महाराज यांनी 1974 साली ठेव योजना सुरू करण्यात आली आणि शककर्ते शिवराय या ग्रंथाची निर्मिती झाली. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त प्रतिष्ठानने ना नफा ना तोटा या तत्वावर घराघरात शिवचरित्र पोचविण्याचा संकल्प केला आहे. या कार्याला शिवभक्तांचा उदंड प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण देणे आणि शककर्ते शिवराय या ग्रंथाची इंग्रजी प्रत काढणे ही दोन कार्ये पुढील काळात होणार आहेत. 2025 मध्ये कॅलिफोर्नियात इंग्रजी प्रतीचे प्रकाशन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
 
कार्यक्रमात श्री गुरुमंदिर पत्रभेटच्या ‘अष्टलक्ष्मी विशेषांक’ या दिवाळी विशेषांकाचे गोविंददेव गिरि महाराजांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी पत्रभेटचे संपादक अमर देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. पत्रभेटतर्फे सर्व मान्यवरांना भेटवस्तू व अष्टलक्ष्ी विशेषांक प्रदान करण्यात आला. अजय देवगावकर यांनी यावेळी ‘सदा स्मरावे जिजाऊ नाम’ हे गीत सादर केले.
 
कार्यक्रमाचे संचालन मोहन बरबडे यांनी, तर आभार प्रदर्शन संजय देशकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता शिवाजी महाराजांच्या आरतीने झाली.